Join us  

“राज्यातील भ्रष्ट महायुतीला हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा”: रमेश चेन्नीथला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 4:43 PM

Congress Ramesh Chennithala News: काँग्रेस सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगला विजय मिळाला. आता विधानसभा निवडणुकीत असेच काम करा, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

Congress Ramesh Chennithala News: लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सर्वपक्षीयांना महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारत महायुतीचा पराभव केला. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वास दुपटीने वाढला असून, लोकसभेप्रमाणे तीच किमया आता विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी मोर्चेंबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. यातच राज्यातील भ्रष्ट महायुतीचे सरकार हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात मोठा विजय मिळवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल व विभागाच्या वतीने प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाकडून दादरच्या शिवाजी मंदिर येथे करण्यात आला. यावेळी रमेश चेन्नीथला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणा

काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीला चांगला विजय मिळाला आहे. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा, तालुका, बुथ स्तरावर असेच काम करा आणि राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.   

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला. यात प्रदेश काँग्रेसच्या विविध सेल व विभागाचे कार्य महत्वाचे ठरले आहे. या सर्वांनी राज्यातील गावागावात जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवण्याचे काम केले. काँग्रेसच्या ५ न्याय २५ गॅरंटीचे न्यायपत्र घरोघरी पोहचवण्याचे काम केले आहे. लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नाही. विधानसभा निवडणुकीत असेच काम करुन विजयी पताका फडकवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 

टॅग्स :काँग्रेसमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडी