Maharashtra Politics: कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणूक जिंकत महाविकास आघाडीत नवचैतन्य आणल्याचे सांगितले जात आहे. यातच रवींद्र धंगेकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन आभार भेट घेतली. शिवसेना ठाकरे गटाने कसबा येथे रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला होता. आदित्य ठाकरे यांनीही रवींद्र धंगेकर यांच्यासाठी रोड शो केला होता. यावेळी मीडियाशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सर्व विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो, असे मत व्यक्त केले आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावेळेचा एक किस्सा सांगितला. यानंतर ३० वर्षाचा भाजपचा किल्ला आपण भूईसपाट करून जिंकू शकतो हा आत्मविश्वास केवळ पुणेकरच नाही तर महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे. या निकालाने पुढची दिशा स्पष्ट केली आहे. या विजयाची आपण पुनरावृत्ती करू शकतो. आपण सर्वांनी पुढील निवडणुका एकत्र येऊन लढल्या पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम जनतेने केले आहे
देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम जनतेने केले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील कटुतेवर केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्यासोबत जे गेले नाहीत त्यांच्यावर कारवाई होते, ते काय आहे? राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब आणि नितीन देशमुख यांच्यावर जे चालले आहे, ती सूड भावना नाहीये का? हा बदला नाहीये का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. रोज उठून ठाकरेंविरोधात शिमगा करून काही होत नाही. लवकरच खोकेवाल्यांची होळी होणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिला.
दरम्यान, आमच्याकडील लोकही तुम्ही घेतले. त्यांच्यावर गोमूत्र शिंपडले का? आमच्या लोकांवर आताही चौकशी सुरू आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी सुरू आहे का? की पक्षात घेतल्यावर त्यांना क्लिनचीट देणार आहात का? हा सत्तापिपासूपणा आहे. विरोधकांना नामोहरम करणे सुरू आहे. पक्षात या नाही तर तुरुंगात जा, असे धमकावले जात आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"