लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे झालेले क्रॉस व्होटिंग व विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस काँग्रेसच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चौकशी यांचा अहवाल ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश हे लवकरच पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला; तर सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळेस काँग्रेसचे आमदार गैरहजर राहिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली होती. या मागणीची काँग्रेस हायकंमाडने गंभीर दखल घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांची निरीक्षक म्हणून निवड केली. या सर्व प्रकरणांवर अहवाल देण्याची सूचना केली होती.
तीन दिवसांपासून मोहन प्रकाश हे मुंबईच्या दौऱ्यावर होते. आज ते दिल्लीत परतले असून, लवकरच ते आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत. मोहन प्रकाश यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत तक्रार केली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसमधील नेतृत्वाबाबत मोहन प्रकाश यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.