परळ चेंगराचेंगरी दुर्घटनेला काँग्रेसच जबाबदार, भाजपाच्या किरीट सोमय्यांनी फोडलं खापर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 01:52 PM2017-09-29T13:52:24+5:302017-09-29T17:54:32+5:30
भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी पररळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.
मुंबई : भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी पररळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. गेल्या 15 वर्षांपासून मागणी होत असतानाही काँग्रेस सरकारने या पुलाचा प्रश्न सोडवला नाही, म्हणून ही दुर्घटना घडल्याच्या उलट्या बोंबा सोमय्या यांनी लगावल्या आहेत. दुर्घटना स्थळाला भेट दिल्यावर त्यांनी दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला. मात्र घटनेचे खापर त्यांनी काँग्रेसवरच फोडले. तीन वर्षापासून भाजपा मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या समस्यांवर काम करत आहे. मात्र यापुढील काम युद्ध पातळीवर करण्याची गरजही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
Situation in Mumbai is being continuously monitored. @PiyushGoyal is in Mumbai taking stock of the situation & ensuring all assistance.
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2017
मुंबई पोलिसांनी जारी केले हेल्पलाईन क्रमांक
केईएम हॉस्पिटल : 022-24107000
वेस्टर्न रेल्वे कंट्रोल रूम : 022-23070564, 022-23017379, 022-23635959
मुंबई रेल्वे कंट्रोल रूम : 022-23081725
ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सअॅप नंबर : 8454999999
नेमके काय घडले?
सकाळपासूनच मुंबई शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावरील पत्र्याचा काही भाग खाली कोसळल्याचे वृत्त समोर आले. मात्र पूल सुरक्षित होता. पण या घटनेदरम्यान प्रवाशांमध्ये पूल पडल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमका याचसुमारास जोरदार पाऊस पडला आणि अनेक प्रवासी बाहेर न जाता खोळंबले होते. त्यात नवीन येणारी प्रत्येक गाडी हजारो प्रवासी या दोन्ही स्टेशनांवर येत होते. त्यामुळे थोड्याच वेळात या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. त्यात झालेल्या लहान घटनेमध्ये पूल पडल्याच्या अफवेची भर पडली. काहीजणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची बोंब ठोकली. या सगळ्याचा विपरीत परिणाम होत प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता वाढली.
अफवांवर विश्वास ठेवू नका
अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
कोट्यवधी खर्च करुन उभारला होता पूल
रेल्वे प्रशासनाने परळ येथे कोट्यवधी खर्च करून पादचारी पूल उभारला आहे. हा पूल दादरच्या दिशेला जाणारा आहे. या पुलाचा वापर होणार नाही, त्यामुळे हा पैशांचा अपव्यय ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांसह नागरिकांनी दिली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या प्रतिक्रियांना केराची टोपली दाखवून पूल उभारला. यामुळे मुंबई दिशेकडील पुलावरील प्रत्यक्ष गर्दी जैसे थेच राहिली होती. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला आता तरी जाग येईल का? , असा सवाल संतप्त स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.
दुर्घटनेतील मृतांची नावे
मसूद आलम
शुभलता शेट्टी
सुजाता शेट्टी
श्रद्धा वरपे
मीना वरुणकर
तेरेसा फर्नांडिस
मुकेश मिश्रा
सचिन कदम
मयुरेश हळदणकर
अंकुश जैस्वाल
सुरेश जैस्वाल
ज्योतिबा चव्हाण
रोहित परब
अॅलेक्स कुरिया
हिलोनी देढीया
चंदन गणेश सिंह
मोहम्मद शकील