Join us

हिम्मत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा; पटोलेंचं शिंदे-फडणवीस सरकारला ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 5:09 PM

हिम्मत असेल तर खारघर घटनेची उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून चौकशी करा, पटोले यांचं आव्हान.

"राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल," असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी पटोले यांनी संवाद साधला. "कोणाला काय वाटते आणि कोणाच्या मनात काय आहे, हा आमचा प्रश्न नाही, आम्ही काही पक्षांना बरोबर घेऊन लढत आहोत, त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, देश विकून देश चालवला जात आहे, शेतकरी, तरुणांना बरबाद केले जात आहे, महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या विरोधात एकत्रित लढा दिला पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे, जे पक्ष बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लोकशाही व संविधान वाचवण्याचा लढा देऊ. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे, स्वातंत्र्यानंतर ६० वर्षात देशाला महासत्ता बनवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून वंचित, मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आणि भाजपा मात्र हे सर्व संपुष्टात आणण्याचे काम करत आहे," असे पटोले म्हणाले.

हिम्मत असेल तर खारघर घटनेची उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून चौकशी करा. खारघर घटनेवर शिंदे सरकार सत्य लपवत आहे. सरकारकडून मृतांचा आकडाही जाहीर केला जात नाही. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सुरु होणार होता पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उशिरा आल्याने तो ११.३० वाजता सुरु झाला. रणरणत्या उन्हात लाखो लोक बसले होते. या कार्यक्रमावर सरकारच्या तिजोरीतून १३.८० कोटी रुपये खर्च करूनही लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती आणि त्याचवेळी नेते व मंत्र्यांसाठी आलीशान वातानुकुलीत व्यासपीठ तयार केले होते. लाखो लोक पाण्यासाठी तडफडत असताना हे मंत्री, संत्री शाही भोजन झोडत होते, त्याचे फोटोही प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले."तरीही कार्यक्रम सुरू ठेवला""खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू १२ वाजता झाला तरीही कार्यक्रम सुरुच ठेवला. एवढा मोठा प्रकार घडूनही सरकारचे मंत्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच वेळ दिली होती असा आरोप करुन त्यांना दोषी ठरवत आहेत. या सरकारला जनाचा नाही मनाची जर असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती पण सरकारने एका आयएएस अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली आहे, हा केवळ धुळफेक करण्याचा प्रकार असून सरकारमध्ये हिम्मत असेल तर उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून खारघर घटनेची चौकशी केली पाहिजे," अशी मागणीही त्यांनी केली.

अदानींना जीएसटी माफ, गरिबांकडून मात्र लूट... "मोदी सरकार उद्योगपती अदानींवर मेहरबान आहे हे काही लपून राहिलेले नाही. आता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरणावर अदानी कंपनीला जीएसटी माफ करण्यात आलेला आहे. मोदी सरकार दूध, दही, पीठ, शाळेचे साहित्य यावरही जीएसटी लावून सामान्य जनता, गरिब व शेतकऱ्यांकडून जीएसटी वसूल करते पण अदानीला मात्र जीएसटी माफ करते. मोदींच्या चष्म्यातून अदानी त्यांना गरिब वाटत असावेत म्हणूनच मोदींनी अदानींना जीएसटी माफ केला असावा," असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

टॅग्स :नाना पटोलेएकनाथ शिंदेअमित शाहअदानी