Join us

Maharashtra Politics: “...तर मोदींसह अनेक BJP नेते जन्मठेपेत जातील”; राहुल गांधींच्या शिक्षेवरुन काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 3:56 PM

Maharashtra News: राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात काँग्रेस पक्षाने मुंबईत जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर लगेचच जामिनही दिला. यानंतर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून, केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली.  

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा प्रचारावेळी मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असा सवाल केला होता. याविरोधात गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. या याचिकेच्या सुनावणीवेळी सुरत न्यायालयाने निर्णय दिला. या याचिकेच्या सुनावणीवेळी राहुल गांधी प्रत्यक्ष न्यायालयात हजर होते. मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही, असे राहुल गांधी यांनी न्यायालयाला सांगितले. यानंतर यासंदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

...तर मोदींसह अनेक BJP नेते जन्मठेपेत जातील

सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते......याच कारणामुळे खरे तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील, असे ट्विट करत सचिन सावंत यांनी टीकास्त्र सोडले. दुसरीकडे, राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात काँग्रेस पक्षाने मुंबईत जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत नीरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भूमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले असून त्या भीतीपोटीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला

दरम्यान, काँग्रेस पक्षाचा देशभर वाढता प्रभाव पाहता केंद्रातील सत्ताधारी पक्ष घाबरलेला आहे. या परिस्थितीतूनच विरोधकांवर कारवाई केली आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या दबावतंत्राविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून काँग्रेसने हे आंदोलन केले आहे, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :काँग्रेसकेंद्र सरकारसचिन सावंतराहुल गांधी