Maharashtra Politics: आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी हर हर महादेव या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची दिलखुलास मुलाखत घेतली. या मुलाखतीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, काँग्रेसने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांना शिवाजी महाराज कळले असते, तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते, अशी बोचरी टीका काँग्रेस नेत्याने केली आहे.
सुबोध भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची त्यांची मते, किस्से, आठवणी सांगितल्या. इतकेच नाही, तर गांधी चित्रपट किमान ३० ते ३५ वेळा पाहिल्याचेही सांगितले. तसेच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
एखादा चित्रपट ३०-३२ वेळा पाहण्याची सवय आहेच
राज ठाकरे यांच्यावर लगे रहो मुन्नाभाई किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. पाठीवर हात ठेवणं, चोक होणं, साक्षात्कार वगैरे... एखादा चित्रपट ३०-३२ वेळा पाहण्याची सवय आहेच, असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला समजण्याची इच्छा व्यक्त करण्याआधी राज ठाकरे यांना महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते. खरोखरच महाराज त्यांना कळावे ही सदिच्छा, अशी टीकाही सचिन सावंत यांनी केली आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
१९९४ सालची ही गोष्ट आहे. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. डायरीत शिवजयंतीचे कार्यक्रम लिहिले होते. सामनाचे बाजीराव दांगट आणि त्यांचे भाऊ माझ्याकडे आले. बाळासाहेब फार वर्षांपूर्वी शिवनेरीला आले होते, त्यानंतर ठाकरे घराण्यातील कोणी आलेले नाही, तर तुम्ही या असा आग्रह त्यांनी केला. मी त्यांना व्यस्त असल्याचे सांगत डायरी दाखवत होतो. माझे सगळे कार्यक्रम आखले असल्याने शक्य नाही असे मी त्यांनी सांगत होतो. रात्री मी घरी आल्यानंतर काय झाले माहिती नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात आलो, सर्व कार्यक्रम रद्द केले आणि तिथे शिवनेरी असे लिहिले, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मी काही वेळ एकाच जागी स्तब्ध झालो
पुढे बोलताना, शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मी जुन्नरला गेलो. सकाळी ४ वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली. तेथील खोलीत गेल्यानंतर भिंतीवर कोणीतरी हळद आणि कुंकू टाकले होते, त्याकडे पाहत होतो. तितक्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि “इथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला” असे सांगितले. मी मागे वळून पाहिले असता कुणीच नव्हतं. मी काही वेळ एकाच जागी स्तब्ध झालो. यानंतर मी किल्ल्यावरुन खाली आलो. डोक्यावर पाण्याच्या बाटल्या ओतल्या आणि शांत बसून राहिलो. त्यानंतर मी गड उतरण्यास सुरुवात केली. त्या घटनेनंतर मी तीन ते चार वेळ शिवनेरीला गेलो, पण पुन्हा असे झाले नाही, असा प्रसंग राज ठाकरे यांनी सांगितला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"