मुंबई - आगामी 5 जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. तसेच 1 मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये मनसेची जाहीर सभा होणार असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी दिली आहे. याच दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेवरून काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरे ते हेच का की मग दुसरं कोणी? असं म्हणत राज यांचंचं एक जुनं व्यंगचित्र ट्वीट करत काँग्रेसने खोचक सवाल विचारला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी याबाबत एक ट्विट करत सणसणीत टोला लगावला आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?" असं म्हणत सावंत यांनी राज ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये प्रभू श्रीराम हे चलो अयोध्या असं म्हणणाऱ्या विश्व हिंदू परिषद व भाजपा यांना उद्देशून अहो देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते. राममंदिर’ नव्हे…! असं म्हणत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. शिवाय, शेवटी हे राम…! असंही लिहिलेलं दिसत आहे.
राज ठाकरेंच्या या अयोध्ये दौऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्येचा दौरा कुणीही करू शकतो. प्रभू रामचंद्र सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी कुणी जात असेल तर त्याचं स्वागतच आहे. आम्हीदेखील अनेकदा त्या ठिकाणी जात असतो. कोणाला तिकडे जावं वाटतं असेल, तर त्यात गैर काही नाही. श्री रामाचे भव्य मंदिर तिकडे होत आहे, ते पाहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला. देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला.
आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.