Join us  

Prithviraj Chavan Exclusive: “प्रशांत किशोर मला भेटले होते, ३ तास चर्चा झाली पण...”; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 8:51 PM

Prithviraj Chavan Exclusive: प्रशांत किशोर यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

मुंबई: देशाच्या राजकीय वर्तुळात राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा होऊ लागल्या आहेत. याबाबत काँग्रेस पक्षातच अनेक मतमतांतरे असल्याचे पाहायला मिळत आहे. या एकूणच प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एक गोप्यस्फोट केला आहे. प्रशांत किशोर मला येऊन भेटले होते. आमची तीन तास चर्चाही झाली, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी ‘टू द पॉइंट’अंतर्गत पृथ्वीराज चव्हाण विशेष मुलाखत घेतली. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारची कामगिरी आणि भाजप तसेच काँग्रेस पक्षाची वाटचाल यासह अनेक विषयांवर सविस्तर आणि मोकळेपणाने मते मांडली. प्रशांत किशोर यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यांनी ज्यांच्यासोबत काम केले, त्यांना चांगले यश मिळाले. २०१४ मध्ये मोदींच्या यशात किशोर यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र, ते मान्य करत नाहीत. प्रशांत किशोर यांच्यामुळे पश्चिम बंगाल आणि अन्य निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची चांगली कामगिरी झाली, असे कौतुकोद्गार पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.

काही वर्षांपूर्वी प्रशांत किशोर मला येऊन भेटले होते

या सगळ्या निवडणुका होण्यापूर्वी, काही वर्षांपूर्वी प्रशांत किशोर मला येऊन भेटले होते. तीन तास चर्चा झाली. राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची मते जाणून घेतली. पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून प्रशांत किशोर यांना नेमावे, असे तेव्हा वाटले नाही. प्रभावी विरोधी पक्ष असला पाहिजे, असे त्यांचे मत होते. मात्र, नरेंद्र मोदी यांना विरोध केला नाही, तर एकतर्फी कारभार होईल आणि हुकुमशाहीकडे तो जाईल. ते लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकेल, असे त्यांचे मत होते. त्या भेटीतून प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घ्यावे आणि पद द्यावे, असे काही मनात आले नव्हते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

प्रशांत किशोर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अधिक बोलण्यास नकार

या महिन्याच्या १४ तारखेला सोनिया गांधींशी प्रदीर्घ चर्चा झाली. त्यावेळी प्रशांत किशोर विषय नव्हता. त्या बैठकीत माझे काम, पीएमओमधील माझा कार्यकाळ याबाबत स्मरण करून दिले, असे त्यांनी सांगितले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिलेल्या काही पर्याय, प्रस्तावांबाबत विचारणा केली असता, चव्हाण यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. व्यापक विरोधी आघाडी तयार झाल्याशिवाय भाजपला पराभूत करता येणार नाही. त्यासाठी आणखी पक्षांना समाविष्ट करून घ्यावे लागेल. त्यासाठी जागांचा फॉर्म्युला वेगळा असेल. या सर्वांचा व्यापक विचार करून प्रशांत किशोर यांनी काही प्रस्ताव दिला असेल, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षांची एकजूट महत्त्वाची. त्यात समविचारी पक्षच एकत्र येतील. मात्र, काँग्रेसशिवाय ही आघाडी शक्य नाही. कारण काँग्रेस राष्ट्रव्यापी पक्ष आहे. मात्र, कोणत्या तरी एका पक्षाला अँकरची भूमिका घ्यावी लागेल. काँग्रेस पक्षाची स्वतःची एक घटना आहे. त्यानुसारच काम व्हायला हवे. सोनिया गांधी तब्येतीच्या कारणावरून पाच राज्यातील निवडणुकात एकाही राज्यात त्या प्रचारासाठी गेल्या नाहीत. हे सगळे वास्तव आहे. पण आता त्यांनी काँग्रेसची सद्यस्थिती बदलण्याचा निर्धार केला आहे. पाच राज्यातील दारूण पराभवानंतर आता त्यांनी सक्रीयपणे काम करण्याचे ठरवले आहे. तळागाळात जाऊन काम करणे महत्त्वाचे आहे. काँग्रेसने प्रशांत किशोर यांचे सहकार्य घ्यावे. पक्षात घ्यायचे की नाही, पद कोणते द्यायचे हा निर्णय सर्वस्वी सोनिया गांधींचा आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. 

टॅग्स :पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेसप्रशांत किशोर