Join us

‘मविआ’ जागा वाटपात खरी रस्सीखेच काँग्रेस-शिवसेनेत! जालनाची जागा दोघांनाही हवी

By यदू जोशी | Published: February 24, 2024 5:27 AM

रामटेकची जागा काँग्रेस व शिवसेना हे दोघेही मागत असल्याने तिढा आहे. जालनाच्या जागेवर या दोघांनीही दावा सांगितल्याने पेच आहे. वर्धा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने मागितल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

यदु जोशी

मुंबई :महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणत्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. कोणत्या जागा कुठल्या पक्षाकडे जाऊ शकतात याची माहिती समोर येत आहे. तीन पक्षांमध्ये जास्त रस्सीखेच ही काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यात असल्याचे चित्र आहे.

रामटेकची जागा काँग्रेस व शिवसेना हे दोघेही मागत असल्याने तिढा आहे. जालनाच्या जागेवर या दोघांनीही दावा सांगितल्याने पेच आहे. वर्धा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने मागितल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. असे असले तरी ही जागा आम्हाला द्या, आमच्याकडे दमदार उमेदवार असल्याचा दबाव शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) जागा वाटपाच्या चर्चेत आणला जात आहे. मात्र काँग्रेस रामटेक सोडायला तयार नाही. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीत होते तोवर भंडारा-गोंदियासाठी आग्रही राहत आलेल्या राष्ट्रवादीने (शरद पवार) या जागेवरील दावा जवळपास सोडल्याचे चित्र असले तरी वर्धेच्या मोबदल्यात आम्ही ही जागा सोडतो, अशी भूमिका त्यांनी घेत चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे.

राहुल गांधी, शरद पवार यांच्यात लोकसभा जागा वाटपाबाबत चर्चा

महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली. त्यांनी सांगितले की, पवार व राहुल यांच्यात दूरध्वनीवरून जागावाटपाबाबत चर्चा झाली. महाविकास आघाडीत लोकसभा जागांच्या वाटपाबद्दल जी बोलणी सुरू आहेत त्याबद्दल तसेच संघटनात्मक बाबींविषयी चर्चा करण्यासाठी पाटील यांनी शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली होती.

व र्धा मतदारसंघात माजी आमदार हर्षवर्धन देशमुख किंवा आ. अनिल देशमुख यांच्यापैकी एकाला  लढविण्याचा विचार राष्ट्रवादी करत असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन देशमुख यांनी तिथे संपर्क वाढविला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या जागा काँग्रेसकडे जातील हे स्पष्ट आहे. बुलडाणात शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात वाद आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास अकोला त्यांच्याकडे जाईल. वाशिम-यवतमाळवर काँग्रेस, शिवसेना दोघांनीही दावा केला आहे. अमरावती काँग्रेसकडे जाऊ शकते.

म राठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा शिवसेना-काँग्रेस या दोघांची दावेदारी आहे. जालनामध्येही तेच चित्र आहे. बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव या जागा शिवसेनेला देण्यावर एकमत झाल्याचे चित्र आहे. आधी नांदेड, हिंगोली, परभणी आम्हालाच पाहिजे, असे म्हणणारी काँग्रेस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने बॅकफूटवर गेली आहे. तरीही त्यांनी दावेदारी सोडलेली नाही.

उ त्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार काँग्रेसकडे जाईल. नाशिकमध्ये शिवसेनेचा दावा आहे. दिंडोरीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी दोघेही आग्रही आहेत. शिर्डी शिवसेनेकडे तर अहमदनगर राष्ट्रवादीकडे असे ठरले असतानाच काँग्रेसने अहमदनगर मागितले. प. महाराष्ट्रात पुणे काँग्रेसला तर बारामती, शिरुर, मावळ राष्ट्रवादीला असे होऊ शकते. सातारा राष्ट्रवादी, कोल्हापूर काँग्रेस असे वाटप दृष्टीपथात आहे. हातकणंगलेत शिवसेना, राष्ट्रवादी दोघांचाही दावा आहे. सोलापूर काँग्रेसकडे जाईल, हे स्पष्ट आहे. सांगलीत काँग्रेसची दावेदारी प्रबळ आहे.

मुं बईत काँग्रेसने उत्तर-मध्य, दक्षिण-मध्य आणि उत्तर-पश्चिम या ३ जागा मागितल्या आहेत. त्यातील दोन त्यांना मिळू शकतात. शिवसेनेकडे ४ जागा जातील. कोकणात सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ठाणे, कल्याण-डोंबिवली, रायगड, पालघर शिवसेनेला, भिवंडी काँग्रेसला असे चित्र आहे. पालघरसाठी काँग्रेस आग्रही आहे. रायगडवर राष्ट्रवादी व काँग्रेसनेही दावा केला आहे.

समझोता दोन दिवसांत जाहीर करा : ॲड. प्रकाश आंबेडकर

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीनही पक्षांनी त्यांच्यात झालेल्या राज्यातील जागा वाटपाचा समझोता जाहीर करून, त्यामध्ये आमच्या पक्षाच्या जागा कोणत्या पक्षाच्या कोट्यात गेल्या, याबाबतची माहिती दोन दिवसांत लेखी स्वरूपात किंवा माध्यमांद्वारे द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केली.

टॅग्स :महाविकास आघाडीनिवडणूक