मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या सन्मानाबद्दल काँग्रेसने शिकवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:05 AM2021-05-27T04:05:33+5:302021-05-27T04:05:33+5:30
मुंबई : भाजप सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच बनवले. त्यामुळे मराठा आरक्षण असो ...
मुंबई : भाजप सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच बनवले. त्यामुळे मराठा आरक्षण असो किंवा छत्रपतींचा सन्मान याबद्दल कोणी भाजपला शिकविण्याची गरज नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसला फटकारले.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या टीकेला बुधवारी दरेकर यांनी उत्तर दिले. काँग्रेसने आजवर कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला, हे उघडच आहे. त्याबद्दल आधी सचिन सावंतांनी सांगावे. स्वतःला कधीतरी आमदारकी मिळेल याची वाट पाहत खुळावलेल्या सचिन सावंतांनी उगाच छत्रपती संभाजीराजे यांची उठाठेव करू नये, अशा शब्दांत दरेकर यांनी सावंतांच्या आरोपांचा समाचार घेतला. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार केले. त्यापाठोपाठ प्रयागराज येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी संभाजीराजेंचा सन्मान पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोर भर सभागृहात केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी उभे राहून संभाजीराजेंचे अभिनंदन केले होते, याची आठवणही दरेकर यांनी करून दिली.
राज्यात १९९९ पासून १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. तर, केंद्रात ................. वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस आघाडीने समाजाला आरक्षण देण्याऐवजी मराठा कार्यकर्त्यांना मारझोड करण्याचेच काम केले. पण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवून दाखवले. भाजपचे सरकार असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही स्थगिती आली नाही. या सर्व काळात चंद्रकांत पाटील हेच मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांना मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू चांगली समजते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सचिन सावंतांनी कायदेशीर बाजू शिकविण्याच्या फंदात पडू नये. मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे आणि ते कसे टिकवायचे हे आम्हाला चांगले समजते. तुम्हाला जमत असेल तर सर्वोच्च न्यायालयात किमान फेरविचार याचिका तरी दाखल करा, असे आव्हानच दरेकर यांनी दिले.