क्रांती मैदानावरून काँग्रेसचा ‘मोदी सरकार, चले जाव’चा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:07 AM2021-02-13T04:07:39+5:302021-02-13T04:07:39+5:30
नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली क्रांती मैदानावरून काँग्रेसचा ‘मोदी सरकार, चले जाव’चा नारा नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष ...
नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली
क्रांती मैदानावरून काँग्रेसचा ‘मोदी सरकार, चले जाव’चा नारा
नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी मावळते अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात ‘मोदी सरकार, चले जाव’चा नारा दिला.
नाना पटोले यांनी शुक्रवारी टिळक भवन कार्यालयात बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिक पदभार स्वीकारला. त्यानंतर विधान भवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. विधान भवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टरवरून मार्च काढत आणि वाटेत लोकमान्य टिळक यांच्यासह सर्व महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करून क्रांती मैदानाजवळील ‘गोकुळदास तेजपाल’ सभागृहात ते दाखल झाले. यावेळी प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह मंत्रिमंडळातील काँग्रेसचे सर्व मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसची स्थापना ज्या गोकुळदास तेजपाल सभागृहात झाली, तिथे नेत्यांच्या बैठकीत हुकुमशाही पद्धतीने वागणारे व काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे ‘मोदी सरकार चले जाव’ असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
या बैठकीनंतर ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी मावळते अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कारकिर्दीचे कौतुक केले. तसेच आगामी काळात नाना पटोले सर्वांना एकत्र घेऊन परिणामकरक संघटन उभारतील, असा विश्वास व्यक्त केला. पक्ष मजबूत करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. तसेच राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारचे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू करणार नाही, असा प्रस्ताव मंजूर करण्याचे आवाहन सर्व काँग्रेस मंत्र्यांना केले. केंद्राचे कायदे फेटाळून लावण्यासाठी जी पावले उचलायची आहेत, ती लवकर उचला. येत्या अधिवेशनात तसा कायदा मंजूर करा, असे आवाहन एच. के. पाटील यांनी केले.
* कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा संकल्प
प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा संकल्प व्यक्त करतानाच नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार टोलेबाजी केली. काँग्रेसने देशात संपत्ती निर्माण केली. सार्वजनिक कंपन्या उभारल्या; पण मोदी सरकारने कोकण रेल्वेपासून सर्व कंपन्या विकायला काढल्या. देश विकण्यासाठी मोदींना सत्ता दिली नव्हती. कोकण रेल्वेपासून सर्व सार्वजनिक कंपन्या विकायला काढण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. मात्र, महाराष्ट्रातील एकही प्राॅपर्टी केंद्र सरकारला विकू देणार नाही. वेळ पडली तर आंदोलन छेडू, असा इशारा पटोले यांनी दिला. मोदींच्या भाजप सरकारचा चार्ज काढण्यासाठी आज मी प्रदेशाध्यक्ष पदाचा चार्ज घेत असल्याचा टोलाही मारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत आमच्या अन्नदात्याला आंदोलनजीवी म्हणतात. पण, सत्तेसाठी ढोंग सोंग करणारे मोदी हे ढोंगीजीवी आहेत. त्यामुळे आजपासून त्यांना ढोंगीजीवी हे नाव देऊ, असेही पटोले म्हणाले.
* काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे - अशोक चव्हाण
काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसारच राज्यातील सरकार चालेल, असे सांगत अशोक चव्हाण यांनी एकप्रकारे राज्यातील सहकारी पक्षांना इशारा दिला. थोरातांनी कठीण प्रसंगात पक्षाचे चांगले नेतृत्व केले. आता नाना पटोले यांच्या नेतृत्वात सर्वजण मिळून भाजपची पाळेमुळे खणून काढू. गटातटाचे विचार बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येऊन ‘रिझल्ट’ द्यायला हवेत. जिल्ह्याजिल्ह्यांतून आम्ही किती लोक निवडून आणतो, आज ४०-४२ असलेले काँग्रेसचे आमदार शंभरच्या पुढे गेले पाहिजेत, असे चव्हाण म्हणाले.
* आपल्याला पक्ष वाढविण्याचा पूर्ण अधिकार - थाेरात
पक्ष आहे म्हणून सरकार आहे. काँग्रेसचे सिद्धांत आणि विचारांसाठीच राज्यातील सरकार आहे, असे सांगतानाच आपला पक्ष वाढविण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. निवडणुकीपूर्वी ऎनवेळी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. अडचणीच्या काळात ४४ आमदार निवडून आणले. त्यानंतर भाजपला सत्तेपासून रोखण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केल्याचे सांगतानाच थोरात यांनी पुढील वाटचालीसाठी पटोले यांना शुभेच्छा दिल्या.
* पक्षाला नवसंजीवनी देतील - सुशीलकुमार शिंदे
नाना पटोले यांचे नेतृत्व हे बंडखोर नेतृत्व आहे. ज्या काळात मोदींविरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती, त्यावेळी नानांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षासाठी एका क्षणात विधानसभा अध्यक्षपद सोडले. पटोलेंच्या रूपाने आता पक्षाला चांगला सेनापती मिळाला आहे. त्यांच्या हातात पक्षाची सूत्रे आहेत. ते पक्षाला नवसंजीवनी देतील, असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
* केंद्र सरकारविरोधात सज्ज रहा - पृथ्वीराज चव्हाण
आज आपल्यासमोर आव्हाने आहेत. मोदी सरकार मनमानी काम करीत आहे. या सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले, देशाच्या संविधानावर घाव घालत आहेत. चीनने लडाखमध्ये जमीन काबीज केली. आता ती जमीन सोडायला ते तयार नाहीत. यासाठी केंद्र सरकारविरोधात सज्ज राहण्याचे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
-------------------