Join us

“विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये”; हर्षवर्धन सपकाळ यांनी केला राहुल गांधींचा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:44 IST

Congress Harshvardhan Sapkal News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवरून विरोधकांनी टीका केली. या टीकेला आता काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिले.

Congress Harshvardhan Sapkal News: जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवजयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशभरातली अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्स पोस्टवरुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा मोठी चूक केली आहे. यावरून विरोधकांकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. या टीकेला आता काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्तर देताना राहुल गांधी यांचा बचाव केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे राहुल गांधी यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्याऐवजी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता या पोस्टवरुन नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. यावरून भाजपा नेत्यांनी केलेल्या टीकेला हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले.

विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन न करता विरोधकांनी राहुल गांधींच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. हा खेळ काही विरोधकांचा नवा नाही, पंडित जवारलाल नेहरू यांच्या संदर्भात अशाच प्रकारचे काम करण्यात आले होते. राहुल गांधींच्या ट्विटचे गुगल ट्रॉन्सलेट केल्यास श्रद्धांजली शब्द येतो आहे. ही एक तांत्रिक चूक पण विरोधक विनाकारण राजकरण करत आहेत. मी त्यांना अभिवादन करतो, मी त्यांचा आदर करतो, हा त्यांच्या मागचा भाव आहे. त्यामुळे विरोधकांनी ध चा मा करु नये, असा पलटवार सपकाळ यांनी केला. 

भाजपा नेत्यांनी साधला राहुल गांधीवर निशाणा

जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात. पण राहुल गांधी हे नेहमीच देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांविषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात. त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे. ही पोस्ट त्यांनी तात्काळ मागे घ्यावी. आदरांजली शब्दाचा वापर करावा अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास शिवाजी महाराजांनी धरली होती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही महाराजांची शिकवण आहे, ती शिकवण त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

टॅग्स :काँग्रेसहर्षवर्धन सपकाळराहुल गांधीशिवजयंतीछत्रपती शिवाजी महाराज