काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं. मुंबई महापालिकेत मनसे आणि भाजप एकत्रित निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.
नाना पटोले म्हणाले, भाजप मत विभाजनाच राजकारण करत आहे. मतविभाजन कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. नऊ वर्षाच्या जाहिराती पेपरला देतच आहेत, यासह नऊ वर्षात देशाच काय, काय विकलं हे सांगायला हवं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टींना टॅक्स भरावा लागतो.
"महागाईमुळे लोकांचे जीवन उध्वस्त झाले आहे, आताची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली असती तर आपण त्यांना विश्वगुरु म्हटले असते, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.
माध्यमात फक्त महाविकास आघाडीच्या बातम्या समोर येत आहेत, भाजप आणि शिंदे गटात काही अलबेल आहे का? तीन पक्ष एकत्र आल्यानंतर होत राहतात या गोष्टी. काँग्रेसची भूमिक स्पष्ट आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊ. काँग्रेस समन्वयक आहे, देश वाचवणे ही आमची भूमिका आहे. सध्या देश महत्वाचा आहे, देशाचे संविधान धोक्यात आले आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
'आमचा तरुण मित्र हरपला'
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणी सांगितल्या. नाना पटोले म्हणाले, आमचा तरुण मित्र हरपला, ही दुख:द घटना काँग्रेससाठी आहे. समाजाला न्याय देण्याच असलेलं व्यक्तीमत्व आज आमच्यात नाहीत.