Join us  

'राज्यातील सर्व घटकांना रस्त्यावर आणण्याचे पाप ट्रिपल इंजिन सरकारचेच'; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 5:01 PM

भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत त्याचेच परिणाम देश भोगत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. काल (मंगळवारी) अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस सुरु आहे. याचदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

राज्यात सध्या डॉक्टर संपावर आहेत, तरुणमुले  रस्त्यावर आहेत, पेपरफुटीला सरकारी अधिकारी जबाबदार आहेत याचे पुरावे मुलांनी दिले, शेतकरी रस्त्यावर आहे, निर्यातबंदी उठवली म्हणून बातम्या पसरवल्या पण कांदा अजून सडत आहे, शेतकरी रस्त्यावर आहे. सरकारी कर्मचारी रस्त्यावर आहेत. शिंदे-फडणीस-पवारांच्या ट्रिपल इंजिन सरकारने राज्यातील जनतेला रस्त्यावर आणले आहे. भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत त्याचेच परिणाम देश भोगत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

महाराष्ट्रात ड्रग्जचा काळा बाजार जोरात सुरु आहे, त्यात गृहमंत्रालयाचा मोठा सहभाग दिसत आहे. तरुण पिढीला ड्रग्जचे विष देऊन बरबाद केले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज कुठुन येते? हे सांगितले जात नाही पण गुजरातच्या मुंद्रा बंदरातून येत आहे हे स्पष्ट आहे. मुंद्रा बंदर कोणाचे आहे हे जगजाहीर आहे, या बंदरात हजारो टन ड्रग्ज अनेकदा सापडले आहे. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणही आम्ही उचलून धरले होते. तरुण पिढीमध्ये ड्रग्जचे जहर पसरवले जात आहे यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले. 

झारीतला शुक्राचार्य कोण, हे समोर आले- 

मराठा आरक्षण मविआ सरकारने टिकवले नाही असा आरोप सरकारमधले लोक करत आहेत. परंतु मविआ सरकार असताना मराठा आरक्षण उपसमितीत एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण होते, अजित पवारही त्या सत्तेत होते. मराठा आरक्षण मविआ सरकार टिकवू शकले नाही तर त्याला हे लोकही जबाबदार नाहीत का? आज हेच एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत व खापर मात्र मविआ सरकारवर फोडत आहेत. “मराठ्यांची बाजू मांडू नये असे देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते” असे तत्कालीन महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनी सांगितले आहे, त्यामुळे झारीतला शुक्राचार्य कोण, हे समोर आले आहे. आता आरोप प्रत्यारोप, जाहिरातबाजी बंद करा, असं म्हणात नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

टॅग्स :नाना पटोलेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवारमहाराष्ट्र सरकार