मुंबई : काँग्रेसने नेहमीच लोकशाही प्रक्रियेला सशक्त केले. कितीही राजकीय संकटे आली, सत्ता आली व गेली पण लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याला व तिला बळकट करण्याला काँग्रेसने प्राधान्य दिले. सत्तर वर्षांत देशात काही झाले नाही, हा भाजपचा कांगावा आहे. डॉ. आंबेडकरांच्या संविधानावर चालण्यास काँग्रेसने महत्त्व दिले. देशाचा विकास काँग्रेसने केला आहे. विरोधकांचा गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न आहे, अशी भूमिका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मांडली.
धारावी मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी गोल्डफिल्ड सोसायटी परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता व मोठ्या प्रमाणात राजस्थानी समाज उपस्थित होता. गेहलोत म्हणाले, देशातील महिलांना राजीव गांधींनी राजकीय क्षेत्रात आरक्षण दिले. लोकसभेत मोदी विजयी झाले. मात्र, जनतेच्या विकासाच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. मोदी आता नवीन आश्वासने देत आहे. भारत व पाकिस्तान एकाच वेळी स्वातंत्र्य झाले. मात्र, भारतात संविधानावर मार्गक्रमण करून लोकशाही प्रक्रिया कायम ठेवण्यात काँग्रेसने नेहमी यश मिळविले.
एकनाथ गायकवाड म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे धारावीतील उद्योजकांचे नुकसान झाले आहे. पाच रुपये दहा रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन सेना भाजप देत आहे. पण ही मंडळी सरकार चालवणार का हॉटेल, असा प्रश्न त्यांनी विचारला.
अंतिम विजय सत्याचाच!देशात मंदीचे वातावरण आहे. खिशातील पैसा संपायला लागला आहे. मात्र, तरीही काही जण अजूनही मोदींचे गुणगान करत आहेत. देशात सध्या भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. सीबीआय, ईडी यांचा कसा वापर होईल सांगता येत नाही. मात्र, अंतिम विजय सत्याचाच होतो हे अटळ आहे. ही परिस्थिती लवकरच बदलेल, असा विश्वास गेहलोत यांनी व्यक्त केला.