Join us  

काँग्रेसच्या याद्यांना गटबाजीचे विघ्न

By admin | Published: February 01, 2017 12:22 AM

मुंबईतील बैठकीत वाद : जिल्हा परिषद निवडणूक; जत आणि मिरज तालुक्याचा निर्णय प्रलंबित

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या याद्या अंतिम करण्यासाठी बोलाविलेल्या मुंबईतील बैठकीत पहिल्याच घासाला गटबाजीचा खडा लागला. यावेळी अंतर्गत गटबाजीवरून जोरदार वादावादी झाल्याने जत आणि मिरज तालुक्यातील याद्यांचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत रविवारी जिल्ह्यातील दहा तालुक्यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या याद्या अंतिम करण्यात आल्या होत्या. प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाच्या मान्यतेसाठी त्या पाठविल्या होत्या. मुंबईत मंगळवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. बैठकीस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, पक्षाचे सांगलीचे निरीक्षक प्रकाश सातपुते उपस्थित होते. या बैठकीत दादा-कदम यांच्यातील गटबाजीचा विषय चव्हाट्यावर आला. जत तालुक्यातील याद्यांवरून वादाची पहिली ठिणगी पडल्याचे समजते. सुरेश शिंदे यांच्या गटाला याद्या तयार करताना डावलण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला. एकसंधपणे काँग्रेसला लढायचे असेल, तर कोणत्याही नेत्याला, कार्यकर्त्याला का डावलले जात आहे?, असा सवाल माजी केंंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी उपस्थित केल्याचे समजते. त्यानंतर सर्वांचा विचार घेऊनच याद्या तयार करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी स्पष्ट केले. जतमधील शिंदे यांच्या गटाला अन्य पक्षांकडून खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. असे झाले तर त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार आहे. अकारण विरोधकांना संधी का द्यायची? आपल्याच पक्षातील लोकांना आपण विश्वासात घ्यायला हवे, असेही मुद्दे बैठकीत मांडण्यात आले. जतमधील काँग्रेसअंतर्गत वादाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. त्यामुळे या गोष्टीची दखल घेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जत तालुक्याचा विषय प्रलंबित ठेवला. हा वाद मिटविण्यासाठी निरीक्षक म्हणून राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. येत्या दोन दिवसात त्यांनी जत तालुक्यातील दोन्ही गटांची माहिती घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून योग्य अहवाल सादर करावा, असे आदेशही चव्हाण यांनी यावेळी दिले. जत तालुक्याप्रमाणेच मिरज तालुक्यातील उमेदवार निश्चितीचा वाद समोर आला. काही जागांवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला. मिरज तालुक्यात पक्षाची सर्वाधिक ताकद असतानाही गटबाजीमुळे नाराजांची संख्या वाढली आहे. याचा फटका पक्षाला निवडणुकीत बसू शकतो, असे मत एकाने मांडले. त्याबाबतही सर्वांशी चर्चा करून शेख यांनी अहवाल द्यावा, असे आदेश प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले. मिरज आणि जत तालुक्यातील नाराजांच्या मुद्यावरून दीड तास चर्चा सुरू होती. या दोन तालुक्यांमुळेच बैठक लांबली. दोन्ही तालुक्यांमधील याद्यांचे काम प्रलंबित ठेवण्यात आले. अन्य तालुक्यांमधील उमेदवारांच्या नावांविषयी चर्चा करण्यात आली. कोअर कमिटीने तयार केलेली अन्य तालुक्यांमधील यादी निश्चित करण्यात आली. (प्रतिनिधी)समिती नियुक्तीवरून वादकोअर कमिटीमध्ये ऐनवेळी विश्वजित कदम यांचे नाव आल्यामुळे प्रतीक पाटील यांनी त्यावर आक्षेप नोंदविल्याचे समजते. एकाच घरातील तीन व्यक्ती कोअर कमिटीत घेतल्याचा, तसेच महिला आघाडीच्या उपाध्यक्षा म्हणून शैलजाभाभी यांचा समावेश न केल्याबद्दल तक्रार करण्यात आली. नेत्यांकडून प्रतिसाद नाही...मुंबईतील बैठकीबाबत प्रतीक पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पक्षीय निरीक्षकांनी अंतिम याद्यांबाबतची माहिती जिल्हाध्यक्षांकडूनच जाहीर होईल, असे स्पष्ट केले. खानापूरचाही विषय चर्चेतखानापूरमधील काही जागांबाबतचा निर्णय घेताना प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांना विचारात घेण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. अशोक चव्हाण यांनी सांगितले की, सदाशिवराव पाटील हे त्या मतदारसंघाचे माजी आमदार तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदार संघातील निर्णय घेताना त्यांचा विचार घेणे महत्त्वाचेच आहे. त्यामुळे त्यांच्या मतांप्रमाणे काही ठिकाणी बदल करण्याचा निर्णयही घेण्यात आला.