Join us

वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; म्हणाल्या, “आभार मानायला आले”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 2:56 PM

Congress Varsha Gaikwad News: उद्धव ठाकरेंनी उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्या हे सांगितले आणि तेथून माझ्या यशाला सुरुवात झाली, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Congress Varsha Gaikwad News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीची चांगलीच धुळधाण उडवल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतही भाजपाला एकच जागा मिळवता आली. उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपा उमेदवार ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

पत्रकारांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. उद्धव ठाकरेंनी सगळ्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या, दौरे केले होते, त्यांनी जे जनतेला आवाहन केले होते, त्याप्रती त्यांना आम्ही भेटायला आलो. त्यांनी सांगितले होते की, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्या, तेथून माझ्या यशाला सुरुवात झाली, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मुंबई काँग्रेसची अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांना भेटायला आले

महाराष्ट्रात, मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मताने काम केले, त्यांचा परिणाम आम्हाला घवघवीत यश मिळाले. शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप, समाजवादी पार्टी असेल सगळ्यांनी आम्हाला मदत केली. आनंद या गोष्टीचा आहे मुंबईत ५ जागा आम्ही जिंकलो. मुंबई काँग्रेसची अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांना भेटायला आले आहे. येणाऱ्या काळामध्ये काम करताना त्याचं मार्गदर्शन आम्हाला प्रेरणादायी आहे. येणाऱ्या विधानसभेची सुद्धा आम्ही चांगली तयारी करणार आहोत. लोकांमध्ये आता विश्वास निर्माण झाला आहे महाविकास आघाडी एकत्र काम करु शकते. एकत्र लढल्यामुळे आमचा विजय झाला, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना ४ लाख ४५ हजार ५४५ मते मिळाली. तर उज्ज्वल निकम यांना ४ लाख २९ हजार ३१ मते मिळाली. वर्षा गायकवाड यांचा १६ हजार ५१४ मतांनी विजय झाला. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४ निकालवर्षा गायकवाडमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४महाराष्ट्र विकास आघाडीमहाविकास आघाडीउद्धव ठाकरे