Congress Vijay Wadettiwar News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर निघालेले मनोज जरांगे यांनी संचारबंदी लागू केल्यावर भांबेरी गावातून अंतरवाली सराटीत परत फिरले. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जे पेराल ते उगवते, असे सांगत काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. तसेच मनोज जरांगेंना सल्लाही दिला.
ही काही मॅच फिक्सिंग आहे का? असा सवाल करत, ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत त्यांनी अशी भाषा वापरू नये. सत्ताधारी आणि जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हा त्यांच्यातला प्रश्न आहे. मनोज जरांगे यांना असे बोलायला लावणे हे पाप कुणाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. चर्चेसाठी भाजपचेच लोक जात होते. तुम्ही जे पेराल ते उगवते. विश्वास कुणावर ठेवायचा, अशी माणसे फोडून अनेक बंड झाले, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. हे अधिवेशन अंतरिम अधिवेशन आहे. प्रश्न उत्तर नाहीत तर लक्षवेधी तरी ठेवा, उद्या आम्ही स्थगन मांडू. विरोधकांचा प्रस्ताव येईल तेव्हा आम्ही चिंधड्या उडवू. सर्व पाप तुम्ही करायचे आणि आरोप मात्र विरोधकांवर करत टीका करायची, या शब्दांत वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर आशा सेविकांचे वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यासांठी आंदोलन सुरू आहे. कुपोषित बालकांची सेवा करणाऱ्या आशा सेविकांची सरकारला कदर नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.