Join us

“अर्थसंकल्प आकड्यांचा खेळ, अदानींच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत”; विजय वडेट्टीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 5:12 PM

Congress Vijay Wadettiwar News: अतिरिक्त अर्थसंकल्पावरील अजित पवार यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला.

Congress Vijay Wadettiwar News: अतिरिक्त अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ अर्थमंत्र्यानी घेतला. अदानीच्या सेवेसाठी हे सेवक काम करत असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

अतिरिक्त अर्थसंकल्पावरील उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावरून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ  घेतला. आम्ही  जे मुद्दे उपस्थित केले त्या सगळ्या मुद्यांच्या संदर्भात आम्हाला बोलू दिले नाही. अर्थसंकल्पात  आकडे फुगवून दाखवले आणि प्रत्यक्ष खर्च कमी दाखवला आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

सरकारकडून सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचे पाप

कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या  २०२३-२४ मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ ४७ टक्के झालेला आहे. मागास वर्गीय समाजाच्या कल्याणावर झालेला खर्च अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय तरतूद आणि BDS वर दिलेला विनियोजन खर्च यात मोठी तफावत आहे. सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचे पाप या सरकारकडून होत आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, या सरकारमध्ये जाणारे आरएसएसच्या  संस्कृतीला, मनुस्मृतीला जपणारे आता निवडणुकीच्या तोंडावर सुरात सूर मिसळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे नाव घेत आहेत. इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकावर  एक रुपया खर्च झाला नाही.  बोलाचा भात अन बोलाची कढी  केवळ वाढवून दाढी राज्यकारभार करता येत नाही. जवळपास मुंबईतील १३ मोक्याच्या जागा  अदानीला  देण्याचा घाट घातला. त्यातील पाच प्रस्ताव पूर्ण झाले आहेत. त्याचा शासन निर्णय  काढला आहे. अदानीच्या राजस्थानमधील सोलर प्रकल्पातून ट्रान्समिशन करून पुढच्या दहा वर्षांसाठी महाराष्ट्राला वीज देण्याचा प्रस्ताव आणि निर्णय या सरकारने घेतला आहे. अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केला. 

टॅग्स :विजय वडेट्टीवारकाँग्रेसविधान भवन