Join us  

“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 6:20 PM

Congress Vijay Wadettiwar News: विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

Congress Vijay Wadettiwar News: महायुती सरकारच्या निरोपाचे हे अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकप्रिय घोषणांचा पाऊस सरकार पाडणार आहे. सरकारच्या जुमलेबाजीला जनता बळी पडणार नाही. बळीराजा हा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक याने पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे आत्महत्या वाढत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली. संवेदना गमावलेल्या सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. जनतेचा विश्वास गमावलेल्या महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे लोकशाहीचा तसेच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, या शब्दांत काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्णक चिघळवला जात आहे. मराठा-ओबीसी, आदिवासी-धनगर यांच्यामध्ये संघर्ष उभा, जाती-जातीत भांडणे लावणे हा महायुती सरकारचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे आरक्षणचा प्रश्न सोडविण्यासाठी जात निहाय जनगणनेच्या मागणीचा पुनरूच्चार आम्ही केला आहे. 

गतीशून्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले 

विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात “गतीशून्य सरकार” पूर्णपणे अपयशी ठरले आहे. वैनगंगा-नळगंगाचा प्रकल्प मार्गी लावण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास सरकार उदासिन आहे. वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ केंद्र सरकार देत नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात नव्याने विकासाचा अनुशेष निर्माण होत आहे. शेतजमिनी व पर्यावरणाचा विध्वंस रोखण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा आणि तो पैसा शेतकऱ्यांच्या योजनांसाठी वापरावा अशी मागणी सध्या सध्या जोर धरत आहे. या मागणीकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

पेपरफुटीविरोधात सरकारने कडक कायदा आणावा 

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नीट परीक्षा आता दलालांच्या हातात गेली आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी नाही. राज्यात तलाठी  भरतीमध्ये तसचे इतर परीक्षा भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्यामुळे परीक्षार्थी नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. त्यामुळे याच अधिवेशनात पेपरफुटीविरोधात सरकारने कडक कायदा आणावा यासाठी आम्ही आवाज उठविणार आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

तरूणाई ड्रगच्या विळख्यात अडकली आहे

राज्यात अत्याचार वाढले, खून, दरोडे वाढले असून गँगस्टर्सनी डोके वर काढले आहे. वाळू माफीयांचा हैदोस वाढला. वाळू माफियांचे हल्ले वाढले आहेत. पुणे, नागपूर येथील हिट अँन्ड रन प्रकरणामुळे नाचक्की झाली. महायुती सरकार राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. तरूणाई ड्रगच्या विळख्यात अडकली आहे, असा निशाणा वडेट्टीवार यांनी लगावला.

दरम्यान, मनुस्मृती सरकारमधील शिक्षणमंत्री हे जाहीर कार्यक्रमात म्हणतात मनुस्मृतीचा श्लोक आम्ही पाठ्यपुस्तकात घालणार. म्हणजे मनुस्मृतीचा चंचूप्रवेश करून तुमची पुढची भूमिका काय असणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या चातुवर्ण व्यवस्था आणण्याच्या धोरणाला आम्ही कडाडून विरोध करणार असल्याचे महाविकास आघाडीने स्पष्ट केले. 

टॅग्स :काँग्रेसविजय वडेट्टीवारमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडीविधानसभा