Congress Vijay Wadettiwar News: राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी, ‘भ्रष्टाचारी झाले चौकीदार, असा महायुतीचा कारभार’, ‘भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चीट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बेस्ट बस सेवेचा मुद्दा मांडत सरकारला लक्ष्य केले. बेस्टमध्ये पन्नास टक्के जागा रिक्त आहेत. एका बाजूला बेस्टच्या गाड्यांची कमतरता आहे. तर दुसऱ्या बाजूला निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. जेवढे निवृत्त होत आहेत, पण भरती होत नाही आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधत बेस्टच्या सुधारण्यासाठी शासन ठोस काही करेल का असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
बेस्टच्या गाड्या पूर्णतः भंगार झाल्या आहेत
बेस्टच्या अवस्थेकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बेस्टला पाच हजार दोनशे कोटी रुपये मदत केली होती. आता दहा हजार कोटीची बेस्टला आवश्यकता आहे कारण बेस्टच्या गाड्या पूर्णतः भंगार झाल्या आहेत. सभागृहातील एका सभासदाने स्पष्ट सांगितले की, बेस्टच्या गाड्या खराब होत्या त्यामुळे त्या वापरणे योग्य नव्हत्या, म्हणून क्रिकेटरची मिरवणूक ही गुजरातच्या गाडीवर बसून काढावी लागली. ही बेस्टची अवस्था आहे. याकडे लक्ष वेधत परिवहनच्या ४० टक्के जागा शिल्लक आहेत साठ टक्के जागा रिक्त झाल्या आहेत. अभियंता शाखेत चार हजार सहाशे पैकी तेवीसशे जागा शिल्लक आहेत. पन्नास टक्के जागा रिक्त आहेत. असे असताना बेस्ट चालणार कशी, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या आमदारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. भ्रष्टाराला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चीट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भाजपाच्या वॉशिंग मशिनचा धिक्कार असो, भ्रष्टाचारी सरकार हाय हाय, टक्केवारी सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, हिट अँड रनच्या आरोपींना मदत करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला.