Join us

“बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले? टॅक्स-मतांसाठी आठवण, द्यायची वेळ आली की...”: वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 1:21 PM

Vijay Wadettiwar Reaction On Union Budget 2024: देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar Reaction On Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विद्यार्थी वर्ग, तरुण, शेतकरी, महिला, स्टार्टअप यांसाठी अनेकविध योजना घोषित केल्या. तसेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. कररचनेत बदल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, बिहार तसेच ओडिशा राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले, अशी विचारणा केली आहे.

देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना मोदी सरकारने रिटर्न गिफ्ट दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. बिहारमध्ये मोठे मेडिकल कॉलेज, नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. तर अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला विशेष पॅकेजची भेट मिळाली आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेटमध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनीही भाजपा सरकारला पाठिंबा  दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळाले-ठेंगा! देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजपा सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपाकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचे? टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य. महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल!, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना दिली. 

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्याने कॅन्सरवरील औषधं स्वस्त झाली आहेत. मोबाईल चार्जरसह अन्य उपकरणावर कर १५ टक्के घट केला आहे. त्याशिवाय सोने, चांदी यांच्यावरील कस्टम ड्युटी कमी करून ती ६ टक्के केली आहे. त्यामुळे सोने चांदी यांच्या किंमतीत घट होणार आहे. त्याशिवाय सरकारने चामड्याच्या वस्तू आणि फुटवेअरवरील कस्टम ड्युटीत घट केली आहे. तसेच  सरकारने पोलाद आणि तांब्यावरील मूळ कस्टम ड्युटी कमी केली आहे. 

टॅग्स :अर्थसंकल्प 2024केंद्रीय अर्थसंकल्प 2019विजय वडेट्टीवारकाँग्रेस