Congress Vijay Wadettiwar News: बृहन्मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त संजय महाले या भ्रष्ट अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर पुन्हा महानगरपालिका सेवेत घेण्याबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत कार्यवाही सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाची ही मनमानी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी आहे. हे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. महाले यांना पुन्हा सेवेत घेण्याची कार्यवाही थांबविण्याबाबत पालिका प्रशासनाला आदेश द्यावेत. महाले यांच्याबाबत आम्ही यापूर्वी केलेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व नगरविकास विभागाच्या सचिवांकडून चौकशी करून या भ्रष्ट अधिकाऱ्याविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महाले सेवेत असताना त्यांच्या भ्रष्ट कारभाराची माहिती, पत्राद्वारे सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्याऐवजी अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. मलिदा गोळा करण्यासाठीच हा सगळा उद्योग आहे. याचा अर्थ मुंबई महानगरपालिका प्रशासकाच्या काळात भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याचा गैरफायदा घेतला जातोय
मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे. रस्ते, पूल बांधकाम, इमारत प्रस्ताव तसेच पर्जन्य जलवाहिन्या या विभागातील कामांमध्ये व निविदांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता केली आहे. ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन निविदा अटी व शर्ती पूरक करून गैरप्रकार केले जात आहेत. याच मुंबई महानगर पालिकेत ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा सन २०१६ मध्ये विधानसभेत उघड करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेतील २६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रॅकेट बाहेर काढण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत संजय महाले या अधिकाऱ्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला होता, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून भ्रष्ट अधिकाऱ्याबाबत सरकारला माहिती देऊन व त्याबाबतचे पुरावे देऊन शासनाकडून आणि महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा पालिका सेवेत घेण्याचे कारस्थान सुरु आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून मुंबई महानगरपालिकेची मनमानी थांबवावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.