Join us  

“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 4:39 PM

Congress Vijay Wadettiwar News: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी एकामागून एक प्रश्न विचारत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Congress Vijay Wadettiwar News: वृत्तपत्रात आलेल्या जाहिराती पाहून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एन्काउंटर झाले आहे का असा प्रश्न पडतो. महिला कुस्तीगीरवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंहचा एन्काउंटर का नाही केला. एकट्या नागपूरमध्ये सहा महिन्यात सहा हजार आठशे एकोणचाळीस गुन्ह्यांची नोंद  झाली आहे. अत्याचार २१३, विनयभंग ३२०, पॉस्को अंतर्गत गुन्हे १७२ आहेत. २१३ महिलांवर अत्याचार होत असेल तर राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का हा प्रश्न पडतो, असा सवाल काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून महायुती सरकारवर बोचरी टीका करत हल्लाबोल केला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची  मागणी होती. भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आले. अक्षय शिंदे शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करू शकला असता, त्याआधीच त्याला संपवण्यात आले आहे, असा मोठा आरोप करत एन्काउंटर प्रकरणाची न्यायिक चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. 

फाशी देण्याची पद्धत अशी आहे का?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरुंगातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. खरे तर मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यात फासावर लटकवू असे सांगितले होते. त्यांची फाशी देण्याची पद्धत अशी आहे का? हा प्रश्न आहे. ज्या प्रकारे पोलिसांनी प्रेस नोट काढली त्यामधून उत्तरापेक्षा प्रश्नच अधिक निर्माण होतात. अक्षय शिंदेला तुरुंगातून नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याच्या चेहऱ्याला मास्क घातलेले असून हाताला बेड्या लावल्या आहेत. तशाच अवस्थेत त्याला गाडीत बसवले असेल तर मग त्याने बेड्या लावलेल्या हाताने बंदूक कशी खेचली? त्याला वाहनातून नेताना त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पोलीस बसले होते का? ते बसले असतील तर आरोपीचा हात पोलिसांच्या बंदुकीजवळ कसा गेला? आरोपीने बंदुकीचे लॉक कसे उघडले? ज्या अधिकाऱ्यांच्या गोळ्यांनी तो जखमी झाला ती गोळी किती अंतरावरून झाडली गेली? असे एकामागून एक प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

दरम्यान, पोलिसांनी काढलेली  प्रेसनोट हास्यास्पद आहे. पोलिसांनी प्रेस नोटमध्ये स्वसंरक्षणार्थ शब्द वापरला आहे. एकाच गोळीत त्याचा मृत्यू झाला. ती गोळी त्याला ताब्यात घेण्यासाठी चालवली होती की, त्याला मारण्यासाठी चालवली होती? कैद्याला ने-आण करण्याचे काम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे नसते. त्यांचे काम तपास करणे असते. मग कैद्यांना ने-आण करण्यासाठी असे अधिकारी का नेमले? हे अधिकारी नेमण्यामागचा उद्देश काय होता? बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे हा महत्त्वाचा दुवा होता. आरोपीची पार्श्वभूमी हत्यारे वापरण्याची नाही, त्यामुळे पिस्तुलचे लॉक आरोपीने कसे काढले, कारण पोलिसांना यासाठी प्रशिक्षण दिले जात. सरकारने आपटेला मोकाट का सोडला हा प्रश्न आहे. असे किती आरोपी असलेले आपटे सरकार पाठीशी घालणार आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :बदलापूरकाँग्रेसविजय वडेट्टीवार