Join us

'त्या'वेळी काँग्रेस सत्तेत होतं, मग टीका आताच का?; सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 7:02 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राकडून चित्ररथासाठी परवानगी मागण्यात आली होती.

मुंबई - गणतंत्र‬ दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ नाही, म्हणून काही लोक लगेच टीकेच्या मार्गी लागले आहेत. विरोधकांची सरकारे असलेल्या राज्यांना वगळले म्हणून ओरड केली जात आहे. अर्थात वस्तुस्थिती त्यांना सोयीस्करपणे जाणून घ्यायची नसेल असा आरोप भाजपाकडून विरोधकांवर करण्यात आला आहे. 

यावेळी भाजपाकडून सांगण्यात आलं आहे की, दरवर्षी 32 राज्यांकडून प्रवेशिका मागविल्या जातात. त्यापैकी 16 राज्यांची निवड होते. केंद्र सरकारचे 8 मंत्रालय असे दरवर्षी केवळ 24 चित्ररथ असतात. वेगवेगळ्या राज्यांना प्रतिनिधीत्त्व मिळावे, म्हणून रोटेशन पद्धतीने निवड होते. ‬महाराष्ट्राला यापूर्वी अनेकदा प्रतिनिधीत्त्व नव्हते. 1972, 1987, 1989, 1996, 2000, 2005, 2008, 2013, 2016 यावर्षी महाराष्ट्राचं चित्ररथ नव्हता. मग ही वर्ष पाहिली तर दोन अपवाद वगळता केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. मग मोदीजींनी महाराष्ट्र-पं.बंगाल वगळले, अशी टीका आताच का? असा टोला भाजपाने विरोधकांना लगावला आहे. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राकडून चित्ररथासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाविरोधी सरकार सत्तेत आल्याने सुडभावनेने ही परवानगी नाकारली असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला गेला. 

महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत, यामागे राजकीय षडयंत्र आहे काय? असा सवाल ट्विटच्या माध्यमातून करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का? असा आरोप त्यांनी केला. 

तर ''प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारं संचलन हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून. विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय. असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले होतं. मात्र सत्ताधाऱ्यांच्या या आरोपावर भाजपानेही ट्विटद्वारे स्पष्टीकरण देत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. 

महत्वाच्या बातम्या

...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी नाकारल्याने सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...

धक्कादायक! यंदाच्या प्रजासत्ताक दिनी संचलनात दिसणार नाही महाराष्ट्राचा चित्ररथ 

'त्या' नेत्यांमुळेच माझं तिकीट कापलं; खडसेंच्या आरोपांवर महाजन म्हणतात...

...म्हणून परदेशातील अनेक भारतीय गोमांस खातात; केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे वादग्रस्त विधान  

 

टॅग्स :भाजपाशिवसेनासुप्रिया सुळेसंजय राऊतकाँग्रेस