मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच त्यांच्याकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली होती. शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. दोन दिवसांनी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी, यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ''मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही'', असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना दिले आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांनी एकत्र येऊन युपीएला बळकटी देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय.
यूपीएचं अध्यक्षपद आता शरद पवारांकडे देण्याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. "शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. यूपीएच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर मी बोलणं योग्य ठरेल", असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा राऊत यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांनी या बातमीत तथ्य नसल्याचं सांगितल्याचं मी ऐकलंय. पण, जर अधिकृतपणे यासंदर्भात प्रस्ताव आला तर आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहिल. सध्या राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस कमकुवत आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन युपीएला ताकद देण्याची गरज असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय.