मुंबईत स्वबळावर लढणार काँग्रेस !
By admin | Published: January 14, 2017 04:33 AM2017-01-14T04:33:40+5:302017-01-14T04:48:50+5:30
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच तर राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची
अतुल कुलकर्णी / मुंबई
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच तर राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, एकटे निरुपम सोडले तर बाकीच्या नेत्यांना राष्ट्रवादीसोबत आघाडी हवी आहे, असे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांचे म्हणणे आहे.
कोणत्या वेळी ताणावे आणि कोणत्या वेळी जोडावे याचे भान काँग्रेसच्या काही नेत्यांना राहिलेले नाही, त्यामुळे भाजपा-शिवसेनेची आपापसात जुंपलेली असताना त्याचा फायदा घेण्याऐवजी आम्ही आपापसात लढत राहिलो तर त्यात आमचेच नुकसान होणार आहे. पण याचे राजकीय भान काही नेत्यांना अजूनही आलेले नाही, हे दुर्दैवी आहे, असे अहिर म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, आमची इच्छा समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी होती आणि आहे, पण काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निरुपम यांनी कोणतीही चर्चा न करताच आम्हाला आघाडी करायची नाही, असे जाहीर करून टाकले. त्यामुळे चर्चेचे दरवाजे त्यांनी बंद करून टाकले आहेत.
आम्ही उलट आजवरच्या तीन निवडणुकांत दोन वेळा वेगवेगळे लढलो, पण जेव्हा एकत्र लढलो तेव्हा आमच्या जागा कमी झाल्या होत्या. पण आज भाजपा-शिवसेनेला पराभूत करायचे असेल तर एकत्र यावे, अशी आमची इच्छा होती पण निरुपम यांना एकतर्फीच निर्णय घ्यायचे असतील तर त्याला कोण काय करू शकतो? कदाचित त्यांना या निर्णयातून त्यांच्या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेला मदत करायची असेल म्हणूनही ते एकत्र लढायला नको म्हणत असतील, असा टोलाही मलिक यांनी लगावला.