Join us

महाविकास आघाडीत धुसफूस, काँग्रेस कोर्टात जाणार; भाई जगताप शिवसेनेवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 3:35 PM

आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या परंतु शिवसेनेने न्याय दिला नाही. हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही असा आरोप भाई जगताप यांनी केला.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सातत्याने काही ना काही कुरबुरी सुरू असल्याचं दिसून येते. शिवसंपर्क अभियानानिमित्त शिवसेनेचे खासदार निधीवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करतात. तर अलीकडेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राष्ट्रवादीनं आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचं विधान केले. आता या वादात महापालिका आरक्षणाची आणखी एक ठिणगी पडली आहे. 

मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत आमच्यावर अन्याय झाला असून शिवसेना योग्य न्याय देत नसल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. इतकेच नाही तर काँग्रेसनं कोर्टात जाण्याचीही भूमिका घेतली आहे. त्यामुळे मविआतील राजकारण चांगलेच तापल्याचं दिसून येते. पनवेल इथं मुंबई काँग्रेसकडून संकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. या शिबिराला पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी भाई जगताप(Bhai Jagtap) म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेच्या संदर्भात २-३ बैठका झाल्या. आमच्या कुठल्याच मागण्या शिवसेना पूर्ण करत नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. फक्त २३ जागांची आरक्षण सोडत झाली. त्यात २१ काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वार्डात आरक्षण पडले. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल शिवसेनेच्या दबावाखाली काम करतात असा आरोप त्यांनी केला. 

तसेच आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या परंतु शिवसेनेने न्याय दिला नाही. हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ज्या वार्डात मागासवर्गीयांची संख्या कमी तिथे एससी आरक्षण झालं आहे. यासारखीच बरीच उदाहरण आरक्षण सोडतीत पाहायला मिळतील. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात दाद मागणार असल्याचा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला. 

काय आहे आक्षेप? पालिका आरक्षण सोडतीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झालेले नाही. काँग्रेसला अधिक त्रास होईल, अशा पद्धतीनेच ही आरक्षण सोडत निघाल्याचा आरोप काँग्रेसचे भाई जगताप यांनी केला. ते म्हणाले की, दक्षिण मुंबईतील ३०पैकी २१ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. कुर्ला भागातही आरक्षण टाकण्यात आले. काँग्रेसच्या २९पैकी २१ नगरसेवकांच्या वॉर्डात महिला आरक्षण पडले आहे, तर लॉटरीसुद्धा २३ जागांसाठीच काढली गेली. अनुसूचित जाती - जमातींसाठी राखीव जागांसाठी लोकसंख्येचे प्रमाण पाहिले जाते. पण, यंदा तसे झाल्याचे दिसत नाही. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि शिवसेनेची ही मिलीभगत आहे. ६ जूनपर्यंत आम्ही आमच्या हरकती, सूचना व आक्षेप मांडणार आहोत. त्या मान्य झाल्या नाहीत, तर मुंबई काँग्रेस न्यायालयात जाणार आहे असा इशारा भाई जगताप यांनी दिला. 

टॅग्स :काँग्रेसशिवसेनामुंबई महानगरपालिका