Join us

काँग्रेसला अंतर्गत वाद भोवणार

By admin | Published: January 25, 2017 5:11 AM

शिवसेना व भाजपा स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याने, गेली २१ वर्षे विरोधी पक्षाच्या बाकावर बसणाऱ्या काँग्रेसला सुवर्णसंधी चालून आली होती.

शेफाली परब-पंडित / मुंबईशिवसेना व भाजपा स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याने, गेली २१ वर्षे विरोधी पक्षाच्या बाकावर बसणाऱ्या काँग्रेसला सुवर्णसंधी चालून आली होती. सत्तेसाठी निवडणुकीची खिंड लढविण्याआधीच काँग्रेसमध्ये पळापळ सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेतेच आपसात भिडत असल्याने, नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गटातटांच्या या राजकारणात आपला पत्ता कट होण्याच्या भीतीने अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे. भाजपा, एमआयएम, समाजवादी या पक्षांकडून आॅफरही चालून येत असल्याने, काँग्रेसमध्ये येत्या काही दिवसांत मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.प्रत्येक पक्षात गटातटाचे राजकारण सुरूच असते. मात्र, ऐन निवडणुकीच्या मोसमात काँग्रेसमधील ही गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली आहे. शिवसेना व भाजपा हे मोठे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविण्याची दाट शक्यता असल्याने, काँग्रेसला सत्ता काबीज करण्यासाठी जोर लावण्याची पूर्ण संधी होती. मात्र, ज्यांनी मार्गदर्शन करावे, अशा नेत्यांनीच वादावादी सुरू केल्यामुळे काँग्रेसवर आधी गृहकलह सोडविण्याची वेळ आली आहे. या वादळाची चाहुल गेल्या आॅगस्ट महिन्यातच लागली होती. ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी रद्द करावा, यासाठी मुंबई प्रदेश कार्यालयाबाहेर काँग्रेस नगरसेवक व कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते.मात्र, वेळीच उपाय न झाल्यामुळे निवडणुकीचे बिगुल वाजताच, काँग्रेसमधील गटातटांचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे. बड्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने, त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता व संभ्रमाचे वातावरण आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नगरसेवकांनाही आपल्याला तिकीट मिळेल, याची खात्री नाही. म्हणूनच काही जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत, भाजपा व एमआयएमची वाट धरली आहे, तर यातूनही मार्ग निघेल, या आशेवर असलेल्या काही नगरसेवकांनी आणखी काही दिवस सबुरीने वाट पाहण्याचे ठरविले आहे, परंतु येत्या काही दिवसांत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत.