Join us

कंगनाविरुद्ध काँग्रेस करणार देशद्रोहाच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 5:25 AM

कंगना हिने सातत्याने केलेली वक्तव्ये जाणीवपूर्वक बदनामीच्या उद्देशाने केलेली असल्याच्या भावना काँग्रेसजणांच्या आहेत. 

ठळक मुद्देराज्यभरातील जिल्हाध्यक्षांनी  संबंधित पोलीस ठाण्यांत कंगनाविरुद्ध राष्ट्रद्रोहाची तक्रार नोंदविण्याचे निर्देश नाना पटोले यांनी बैठकीत उपस्थित जिल्हाध्यक्षांना दिले.

गणेश देशमुखमुंबई : स्वातंत्र्याला भीक संबोधणाऱ्या आणि महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला घेरण्याची रणनीती प्रदेश काँग्रेसने आखली आहे. येत्या दाेन - तीन दिवसांत कंगनाविरुद्ध राज्यभरात राष्ट्रद्रोहाच्या तक्रारी दाखल केल्या जातील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसे आदेशच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. 

कंगना हिने सातत्याने केलेली वक्तव्ये जाणीवपूर्वक बदनामीच्या उद्देशाने केलेली असल्याच्या भावना काँग्रेसजणांच्या आहेत. युवक काँग्रेसच्या निवडणुकांसंबंधाने बुधवारी रात्री गांधी भवनात प्रदेश काँग्रेसची  बैठक झाली. अजेंडा निवडणुकीचा असला तरी कंगनाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत अत्यंत तीव्र भावना व्यक्त झाल्या. कंगनाची वक्तव्ये राष्ट्रविराेधी आणि तिचे कृत्य राष्ट्रद्रोही असल्याच्या मुद्यावर उपस्थितांचे एकमत झाले. कंगनाच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तिला कायदेशीररीत्या घेरण्याची रणनीती बैठकीत ठरविण्यात आली. राज्यभरातील जिल्हाध्यक्षांनी  संबंधित पोलीस ठाण्यांत कंगनाविरुद्ध राष्ट्रद्रोहाची तक्रार नोंदविण्याचे निर्देश नाना पटोले यांनी बैठकीत उपस्थित जिल्हाध्यक्षांना दिले. दोन-तीन दिवसांत या निर्देशांची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

स्वातंत्र्यलढ्याची आणि महात्मा गांधीजींची हेतुपुरस्सर बदनामी करून कंगनाने राष्ट्रद्रोह केला आहे. प्रदेश काँग्रेसने त्याविरुद्ध राज्यभरात देशद्रोहाच्या तक्रारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

नागपूर पोलिसांत राष्ट्रद्रोहाची तक्रार शुक्रवारी देणार आहे.- विकास ठाकरे, आमदार, नागपूर पश्चिम

टॅग्स :कंगना राणौतकाँग्रेस