मुंबई - काँग्रेसच्या हातून एकापाठोपाठ एक राज्य जात चालले आहे, अशा परिस्थितीत हा पक्ष २०१९ च्या निवडणुकीत अपेक्षा कसा ठेवू शकतो? पुढील निवडणुकांत आम्ही सत्तेवर येणार, असे काँग्रेसचे म्हणणे म्हणजे दिवास्वप्न पाहण्यासारखे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. येथे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी मुंबईत याच कार्यक्रमात मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. भाजपच्या ‘अच्छे दिन’ची अवस्था अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील ‘शायनिंग इंडिया’सारखीच होईल आणि पुढील वर्षी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला होता. त्याबाबत विचायलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, अच्छे दिन येत असल्याची जाणीव लोकांना होत आहे. त्यामुळेच ते आम्हाला वेगवेगळ्या राज्यांत निवडून देत आहेत. आम्ही ईशान्य भारतातील राज्यांत विजय मिळवला. जिंकले आणि केरळ व प. बंगालमध्येही आम्हाला यश मिळेल, अशीआशा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त करतानाच आपणास पंतप्रधानपदामध्ये रस नाही आणि मोदी हेच आमचे नेते आहेत, असे ते म्हणाले. भाजपा हा कोणा एका नेत्याचा वा आई व मुलाचा पक्ष नाही. तो कधी वाजेपींचा नव्हता, अडवाणींचा नव्हता, गडकरींचा नव्हता आणि आता अमित शहा वा मोदी यांचा नाही. भाजपा हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, असे ते म्हणाले.
सत्तेवर येणार, हे काँग्रेसचे दिवास्वप्नच - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:05 IST