Join us

स्टोरिया फुड्स कार्यालयाची काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्टोरिया फूड्स कंपनीने आपल्या चाॅकलेट शेकच्या जाहिरातीतून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्टोरिया फूड्स कंपनीने आपल्या चाॅकलेट शेकच्या जाहिरातीतून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विडंबन केल्याचा आरोप काँग्रेसने केला. या जाहिरातीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर सात-आठ कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून तोडफोड केली.

कोरोना परिस्थितीमुळे कार्यालयात काही मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

या घटनेनंतर कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी या घटनेचे समर्थन केले. स्टोरिया कंपनीने जाहिरातीच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बदनामी केली. त्याला मुंबई काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोख उत्तर दिले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक. यापुढे असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असा इशाराही जगताप यांनी दिला.

दरम्यान, भाजप नेत्यांनी मात्र या प्रकरणावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. राज्यात काँग्रेस सत्तेत आहे, म्हणून कायदा हाती घेणार का? स्टोरिया कंपनीविरोधात केलेल्या हिंसेचे समर्थन होऊच शकत नाही. मुंबई काँग्रेसने केलेल्या हिंसेचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले.

तर, पंतप्रधान मोदींना चहावाला, मौत का सौदागर, शेठ अशी वाटेल ती विशेषणे लावणारे काँग्रेसचे फाजील नेते एका पप्पूमय जाहिरातीमुळे बिथरले. सत्ता आहे म्हणून ही मस्ती चालली आहे. तोडफोड करणाऱ्या या गुंडांच्या टोळीला लॉकडाऊनच्या नियमातून उद्धवजींनी विशेष सूट दिलेली दिसते, असा टोला भाजपचे मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी लगावला.

----------------------