शेलारांच्या झंझावातासमोर काँग्रेसचा प्रचार फिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 01:59 AM2019-10-26T01:59:36+5:302019-10-26T02:00:28+5:30
मंत्रिपदाचा झाला लाभ; दिग्गज नेते होते प्रचारात
मुंबई : वांद्रे पश्चिम मतदार संघात भाजपचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या प्रचाराच्या झंझावातासमोर काँग्रेसचा प्रचार काहीसा फिका पडला. भाजपने प्रचारात केंद्रीय नेते उतरविले असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. त्यामुळे प्रचारात भाजपने चांगली आघाडी घेतली. शेलार यांच्या आमदारकीच्या व मंत्रिपदाच्या कामगिरीचा लाभ भाजपला झालेला असताना, काँग्रेसने उमेदवारी घोषित करण्यासाठी विनाकारण विलंब केल्याने उमेदवाराला प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही.
काँग्रेसने वांद्रे पश्चिम येथील स्थानिक नगरसेवक आसिर झकेरिया यांना उमेदवारी दिली़ उमेदवारी देण्यासाठी विलंब झाल्याने त्याचा फटका पक्षाला बसला. पक्षाने निवडणुकीच्या सहा महिने अगोदर उमेदवार निश्चित केला असता, तर त्याचा लाभ पक्षाला झाला असता, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. झकेरिया यांची नगरसेवक म्हणून तिसरी वेळ आहे त्यामुळे त्यांचा स्थानिक संपर्क चांगला आहे.
पक्षाकडून या मतदारसंघाकडे लक्ष देण्यात आले नाही. भाजपने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्या, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, माजी केंद्रीय मंत्री शहनवाज हुसेन, भोजपुरी अभिनेता निरहुआ अशी मंडळी प्रचारात उतरविलेली असताना झकेरिया यांना केवळ स्थानिक मदतीवरच अवलंबून राहावे लागले. शेलार यावेळी २६,५०७ मताधिक्याने विजयी झाले. त्यांना २०१४च्या विधानसभा निवडणुकीत २६,९११ मताधिक्य मिळाले होते. त्यांच्या मताधिक्यात ४०४ मतांची घट झाली.
शेलार यांना गेल्या वेळी ७४,७७९ मते मिळाली होती. यावेळी ७४,८१६ मते मिळाली. २०१४ मध्ये काँग्रेसच्या बाबा सिद्दीकींना ४७,८६८ मते मिळाली होती, तर झकेरिया यांना ४८,३०९ मते मिळाली. काँग्रेसने गंभीरपणे या मतदार संघाकडे लक्ष दिलेले नसतानादेखील झकेरियांनी ४८ हजार मते मिळविली. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून पुरेशी मदत झाली असती, तर अधिक चांगली लढत देता आली असती, असा दावा केला जात आहे.