मीरारोड - केंद्रातील भाजपा सरकारने मोठ्या प्रमाणात केलेल्या इंधन दरवाढी मुळे महागाईचा भडका उडाला असल्याचा आरोप करत मीरा भाईंदर मध्ये काँग्रेसने १५ दिवसांचे जनजागृती आंदोलन रविवार पासून सुरु केले आहे . काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले कि , केंद्रातील भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपाकाचा गॅस , पेट्रोल, डिझेल, सीएनजी सह वाणिज्य वापराच्या गॅस मध्ये गेल्या काही वर्षा पासून सात्यत्याने भाववाढीचा जागतिक विक्रम केला आहे, ह्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असून कोरोनाच्या आर्थिक संकटात असलेले सर्वसामान्य नागरिक महागाईने पार होरपळून गेले आहेत .
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत . उद्योग धंदे बंद होत असल्याने युवकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, बेरोजगारी वाढली आहे. परंतु पंतप्रधान आणि भाजपचे नेते - पदाधिकारी मात्र आलिशान जीवन जगत आहेत . निवडणुकां मध्ये पाण्यासारखा पैसे ओतत आहेत . आज सामान्य लोकां कडे खर्चाला पैसे नाहीत मग यांच्या कडे इतके करोडो रुपये येतात कुठून ? असा सवाल सामंत यांनी केला आहे .
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या निर्देशानुसार भाजपा व मोदी सरकारच्या महागाई विरोधात काँग्रेसच्या वतीने मीरा भाईंदर शहरात जनजागृती आंदोलन अभियान राबविण्यात येत आहे. भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी म्हणजेच १४ नोव्हेंबर पासून हे अभियान १५ दिवस चालणार आहे . शहरातील प्रत्येक चौका-चौका मध्ये महागाईचा निषेध करत जनजागृती करण्यात येणार आहे.
आज रविवारी भाईंदर पोलीस स्टेशन समोरील परिसरात कार्याध्यक्ष रौफ कुरेशी यांनी पहिल्या अभियान आंदोलनाचे आयोजन केले होते. नगरसेवक अश्रफ शेख, एस.ए. खान, नगरसेविका मर्लिन डिसा, माजी नगरसेवक फरिद कुरेशी, साहेबलाल यादव, महेंद्र सिंह, अनवर खान, सक्सेना, आंचल मिश्रा, सिद्धेश राणे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते . मोदी सरकार च्या कारभारावर टीका करत महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे, शेतकरी, कष्टकरी, कामगार देशोधडीला लागला असताना मोदी सरकारने काही उद्योगपतींना खुश ठेवण्यासाठी देश विकायला काढला असल्याची टीका काँग्रेस चे प्रवक्ता प्रकाश नागणे केली.