ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीची विशेष जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे मंगळवारी प्रथमच काँग्रेसच्या नेते-कार्यकत्यांना मार्गदर्शन करणार आहे. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही, याबाबत ते भावना समजून घेऊन प्रदेश नेत्यांपुढे मांडतील. स्थानिक पातळीवरील गट-तट संपुष्टात आणून सर्वांनी एका छत्राखाली काम करावे, यासाठी त्यांनी सर्व नेत्यांना बोलावले असून एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाणे, पक्षाच्या बलस्थानांवर भर देणे, पक्षाचा आधार असलेल्या मतदारांपुढे जाण्यासाठी नेते-कार्यकत्यांना काम देण्यावर त्यांचा भर असेल, असे सांगितले जाते. विधानसभा आणि कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत भाजपाने निवडून येण्याची क्षमता असलेल्या अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत आपले स्थान भक्कम केले होते. या वेळीही त्यांची तशी चाचपणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांनी पक्ष सोडून जाऊ नये, यासाठीही राणे आपल्या शैलीत काही सूचना देण्याची शक्यता आहे. काँग्रेसची मंगळवारची बैठक प्राथमिक स्वरूपाची आहे. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्या वरिष्ठांना कळविल्या जातील. त्यानंतर पक्षाची रणनिती ठरेल. त्यासाठी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भूमिका महत्त्वाची असेल, अशी भावना ठाणे शहर प्रमुख बाळकृष्ण पूर्णेकर यांनी व्यक्त केली.
आघाडीचा काँग्रेसचा निर्णय आज?
By admin | Published: May 03, 2016 12:45 AM