Join us

काँग्रेसचा सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काँग्रेसने सध्या सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग सुरू केल्याचे नियुक्त्यांमधून दिसून येत आहे. गटातटांत विभागलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काँग्रेसने सध्या सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग सुरू केल्याचे नियुक्त्यांमधून दिसून येत आहे. गटातटांत विभागलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाई जगताप यांच्याकडे सोपवितानाच कार्यकारी अध्यक्षांपासून विविध समित्यांची घोषणा करीत सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला. शुक्रवारी प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची घोषणा झाली यातही सामूहिक नेतृत्वाचा हाच पॅटर्न वापरण्यात आला. मुंबईतील नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवत पालिका निवडणुकीत कोणती कसर राहणार नाही, याची दक्षताही घेण्यात आली.

शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची घोषणा करताना मुंबईतील दोघा नेत्यांकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आज एकूण सहा कार्याध्यक्षांची घोषणा करण्यात आली. मुंबईतून पक्षातील ज्येष्ठ नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे आता प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतील. चांदिवली येथून सलग चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेले नसीम खान आघाडी सरकारच्या काळात मंत्रीही होते. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता; तर, चंद्रकांत हंडोरे चेंबूरचे माजी आमदार आहेत. याशिवाय माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलवाई राज्यसभेचे माजी सदस्य आहेत.

याशिवाय, शुक्रवारी प्रदेशाच्या संसदीय मंडळाचीही घोषणा करण्यात आली. ३७ जणांच्या या समितीत माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई अध्यक्ष भाई जगताप, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार बाबा सिद्दीकी या मुंबईकर नेत्यांचा संसदीय मंडळात समावेश करण्यात आला आहे.