मुंबई - भाजपा आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कदम यांच्यावर टीका केल्यानंतर, आता काँग्रेसनेही राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोख चव्हाण यांनी राम कदमांच्या वक्तव्यावरुन भाजपाला लक्ष्य केले. मुली पळवून आणण्यासाठी भाजपाने राम कदम यांना आमदार केले काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
भाजपा आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावरुन राजकीय पक्षांनी त्यांना लक्ष्य केले आहे. तर सोशल मीडियातूनही त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यानंतर, आता काँग्रेसनेही राम कदमांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्विट करुन राम कदमांचा निषेध व्यक्त केला. एकीकडे “बेटी बचाओ बेटी पढाओ" म्हणतात आणि दुसरीकडे भाजपचे लोकच महिलांवर अत्याचार करतात. भाजपचे आमदार तरूणांना मुलगी पळवून आणण्यासाठी मदत करण्याची भाषा बोलतात. भाजपने राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का? असा सवाल चव्हाण यांनी विचारला आहे.
दरम्यान, याप्रकरणी केवळ राम कदम यांनीच नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेची माफी मागावी, असे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही राम कदमांचा समाचार घेतला.