माणुसकीचा दुवा जपणारे कनेक्टिंग हार्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 09:54 AM2020-08-08T09:54:07+5:302020-08-08T09:55:27+5:30
कोरोना काळात समाजातील गरजेला वाचा फोडणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्य
मुंबई : अडीअडचणीच्या काळात माणसाने माणसाला मदत करणे हीच खरी माणूसकी आहे. आज सारे जग कोरोनाच्या संकटाने वेढलेले असताना, अनेकजण व्यक्तिगत स्तरावर, तर काहीजण समूह म्हणून या मदतकार्यात उतरले आहेत. अशी ही मदत सुटीसुटी न राहता, जेव्हा व्यवस्थेशी जोडली जाते तेव्हा तिचा परिणाम अधिक दुणावतो. एक समाज म्हणून आपण परस्परांसाठी आपण काय करतो, यावरून आपल्या समाजाची प्रगती ठरत असते. आज कोविड-१९ च्या जागतिक समस्येदरम्यान, स्वयंसेवी संस्था, तर काही वैयक्तिक मदतीच्या माध्यमातून समाजाबद्दल आपल्या जाणिवा ठसठशीत झाल्या आहेत. कोविड-१९ च्या संकटात पलीकडच्या समाजाला जाणून घेण्याची आवश्यकता स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. गरीब, वंचीत समाजापर्यंत पोहचण्याचे दुवे हे या संस्थांच्या माध्यमातून जोडले गेले आहेत अशा काही संस्था -
गेल्या ३० वर्षांपासून गरीब वस्तीतील मुली, महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वाचा संस्थेने कोविड काळात आपल्या कामाचा वेग दुप्पट केला. १८ वस्त्यांमध्ये १५६५ मुलींच्या कुटुंबाना या कोविड काळात अन्नधान्य, सॅनिटरी नॅपकिन्स, हँडवॉश, सॅनिटायझर, साबण सारख्या अत्यावश्यक सेवांचा पुरवठा तर केलाच शिवाय मुलींच्यास शिक्षणाचा मार्ग सुरु रहावा म्हणून ५ मुलींमध्ये एक अशा मोबाईल स्मार्टफोन्सची व्यवस्थाही केली. ,मालवणी, गिल्बर्ट हिल, मरोळ पाईपलाईन , जुहू कोळीवाडा, जोगेश्वरीतील संजय नगर सारख्या ठिकाणाहून स्थलांतर होऊन मुलींचे शिक्षण सुटू नये म्हणून समुपदेशन केले जात आहे. मुलींच्या आरोग्यविषयक तक्रारीसाठी काळजी घेतली जात असून वारली पेंटिंग्स, करिअर गाईडन्स सारख्या वर्कशॉप्सचेही नियोजन केले.
कनेक्टिंग हार्टसारख्या स्वयंसेवी संस्था तर कोविड काळात स्थापन झाल्या आणि अनेकांच्या मदतीने गरीब गरजूना मदतीचा हात देऊ केला आहे. इतकंच नाही तर शोषित महिलांची सुटका झाल्यावर त्यांना घर देऊन काळजी घेण्याची जबाबदारी ही संस्था पार पाडत आहे. ४० पेक्षा जास्त स्वयंसेवक असलेल्या या संस्थेत मागील २ महिन्यांपासून गरजूना केक, चॉकलेट्स, आर्टिफिशल प्रोडक्ट, पेपर बॅग बनविणे, टेलरिंग, अशा अनेक कोर्सेसचे ऑनलाईन ट्रेनिंग दिले जात आहे. त्याचसोबत या संस्थेमार्फत ब्रेस्ट कँन्सर, मेंटल हेल्थ, महिला समस्यांवर अशा विविध सम्स्त्यांवर समुपदेशन आणि जागरूकतेचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. कळ्वामधील ५०० गरजू कुटुंबाना संस्थेमार्फत जेवणाची सोय केली जात असून त्यासोबत आणखी काही वस्त्यांमध्ये दूध, फळे , भाजीपाला, डाळ , तांदूळ, सॅनिटरी नॅपकिन्स सारख्या वस्तूंचे वाटपही महिला स्वयंसेवकांमार्फत होत असल्याची माहिती या संस्थेच्या विश्वस्त सोनू जवळकर यांनी दिली.
कोरोनामुळे अनेक गरीब वस्त्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड आली. सगळ्यात मोठा फटका फटका बसला तो आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून गणली जणाऱ्या धारावी परिसराला. तेथील कुटुंबाच्या कुटुंबे स्थलांतरित झाली. हे सारे होत असताना फीड धारावी नावाचा उपक्रम समाजसेवक स्टॅनली अँटो यांनी सुरु केला. फेसबुक , इंस्टाग्राम, व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडिया माध्यमातून शक्य होईल तितकी मदत त्यांनी गोळा केली आणि गरजूना मदत केली. यास्गळ्यात विशेष म्हणजे उभी केलेली मदत आणि आणि गरजूना केलेले वाटप या सगळ्यात त्यांनी याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कमलाईची पारदर्शकता ही राखली आणि त्यामुळेच त्यांना मिळणारा लोकसहभाग यामुळे वाढला. इतर अनेक संस्थांप्रमाणे स्टॅनली यांनी धारावीतील लोकांना, कुटुंबाना सर्व प्रकारची मदत केली. मात्र महत्त्वाचे म्हणजे यातून आता त्यांनी आरंभ नावाच्या नवीन उपक्रमास सुरुवात केली आहे. धारावीतील अनेक उद्योगधंदे अजूनही बंद आहेत, भविष्याची चिंता आहेच आणि या सगळ्यात तेथील युवा वर्गाला त्यांच्या कुवतीप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये संधी मिळण्याची निकड त्यांना जाणवली. आपल्या स्वयंसेवकांच्या मदतीने स्टॅनली आता विविध कंपन्यांना संपर्क करून तेथील होतकरू तरुणांना नोकरीची संधी मिळवून देण्यात आपला हातभार लावत आहेत आणि आपला हा उपक्रम ते असाच अविरत सुरु ठेवणार आहेत हे विशेष.
वाचाचा उपक्रम पुढील काळात ही अविरत राहणार असून आता लहान मुलांसाठी ही सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. शिक्षणाचा त्यांचा वस्तीतील मुलांचा सबंध तुटू नये हाच या मागचा उद्देश आहे. मुली आणि महिलांच्या वैयक्तिक आणि मानसिक आरोग्याची काळजी तर प्राधान्याने आहेच.- रुपाली पेठकर जोशी , मुख्य प्रकल्प समन्वयक वाचा ट्रस्ट
लॉकडाऊनमुले उदभवलेली आजची परिस्थिती भयानक आहेच मात्र भविष्यातील परिस्थिती उद्विग्न करणारी वाटते. धारावीतील तरुणांना आणि युवा वर्गाला काही प्राथमिक कौशल्ये व आत्मविश्वास शिकविल्यास ही परिस्थिती काही अंशी कमी होऊ शकते. हा उपक्रम यशस्वी झाल्यास भविष्यात विस्तार आणखी वाढविण्याचा विचार आहे.
- स्टॅनली अँटो , समाजसेवक, संस्थापक, फीड धारावी इनिशिएटिव्ह