‘मेट्रो-३ विमानतळासह प्रमुख केंद्रांना जोडणार’
By Admin | Published: March 10, 2017 04:30 AM2017-03-10T04:30:46+5:302017-03-10T04:30:46+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३मध्ये महिला सुरक्षेसंबंधी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३मध्ये महिला सुरक्षेसंबंधी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे विमानतळांना जोडण्याकरिता साधारणत: स्वतंत्र मेट्रो वाहिन्या असतात. मात्र मेट्रो-३ विमानतळासह मुंबईतील बीकेसी, दादर, वरळी, महालक्ष्मी, चर्चगेट या प्रमुख केंद्रांना जोडणारा एकमेव मार्ग ठरणार आहे, असा विश्वासही भिडे यांनी व्यक्त केला.
मेट्रो-३ या मार्गाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. विशेषत: गिरगाव आणि काळबादेवी येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासह आरे कारशेडच्या मुद्द्यांहून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टीका झाली आहे. मात्र तरीही मेट्रो-३ हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्राधिकरण सातत्याने प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून भुयाराच्या मजबुतीकरिता आवश्यक असणाऱ्या टनल रिंगच्या निर्माण कामाचा शुभारंभ वडाळा येथील कास्टिंग यार्ड येथे करण्यात आला आहे.
भुयारीकरणाकरिता लागणाऱ्या टनल बोअरिंग मशिन्स जुलै २०१७ पर्यंत मुंबईत आणण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष भुयारीकरण आॅक्टोबर २०१७ मध्ये नियोजित असून, हा पल्ला गाठण्यासाठी टनल सेगमेंट रिंग
तयार करणे आवश्यक आहे. या रिंगमुळे भुयारीकरणाला मजबुती येणार असून, रिंग सहा कास्टिंग यार्डमध्ये तयार केल्या जाणार आहेत. त्यापैकी चार कास्टिंग यार्ड वडाळा आणि अनुक्रमे दोन दर्गा, जेव्हीएलआर येथे आहेत.
मेट्रो-३ मार्ग हा सहार रोड, आंतरदेशीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ या स्थानकाद्वारे विमानतळाला जोडला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे येथील वृक्षारोपणापासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पॅकेज ६ च्या वृक्षारोपणाच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)
मेट्रो-३ हा कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा संपूर्णत: भुयारी मार्ग असून, यात कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, मेट्रो स्टेशन, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक व वरळी सिद्धिविनायक, दादर, मेट्रो व शीतलादेवी, धारावी, बीकेसी मेट्रो, विद्यानगरी, सांताक्रूझ, सीएसआयए, सहार रोड, सीएसए-आंतरराष्ट्रीय, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ या स्थानकांचा समावेश आहे.