सायन उड्डाणपुलावरील दोन रस्त्यांमधील जोड वाहनचालकांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:06 AM2021-03-14T04:06:34+5:302021-03-14T04:06:34+5:30
मुंबई : सायन येथील टिळक रुग्णालय व एव्हरार्ड नगर या परिसरांना जोडणारा सायन उड्डाणपूल वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या ...
मुंबई : सायन येथील टिळक रुग्णालय व एव्हरार्ड नगर या परिसरांना जोडणारा सायन उड्डाणपूल वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या पुलावरील दोन रस्त्यांमधील जोड वर-खाली झाल्याने वाहने थेट खड्ड्यांमध्ये आदळत आहेत. उड्डाणपुलावर एकूण सात ते आठ ठिकाणी अशी परिस्थिती असल्याने वाहन चालकांना या उड्डाणपुलावरून जाणे त्रासदायक ठरत आहे.
मागील अनेक वर्षांपासून ही परिस्थिती असल्याने अनेक दुचाकीस्वारांना या खड्ड्यांमुळे पाठीचे आजार होत आहेत. तर काही गाड्यांचे सस्पेन्शन यामुळे खराब झाले आहेत. हे दोन रस्त्यांमधील जोड समान अंतरावर आणणे गरजेचे आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षी सायन उड्डाणपूल दुरुस्तीच्या नावाखाली अनेक दिवस बंद ठेवण्यात आला होता. मात्र तरीदेखील वाहनचालकांना या उड्डाणपुलावर समस्यांचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.