एनसीबीने अभिनेत्रीला केली ड्रग्जसह अटक, मीरा रोड परिसरातून कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ड्रग्जचे कनेक्शन केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे तर टॉलीवूडमध्ये पसरले असल्याचे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) सोमवारी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. मीरा-भाईंदर परिसरातील एका हॉटेलमधून हैदराबादच्या एका २७ वर्षाच्या तरुणीला अटक करून ४०० ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. श्वेता कुमारी असे तिचे नाव असून ती टॉलीवूडमध्ये सहायक अभिनेत्रीची भूमिका करीत असल्याचे सांगण्यात आले.
एनसीबीकडून एमडीचा पुरवठा करणाऱ्या तस्करीच्या रॅकेटमधील मुख्य तस्कर व त्यामागील आर्थिक गुंतवणुकीचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनसीबीच्या मुंबई विभागाच्या पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली की, मीरा रोड येथील क्रोवन बिझनेस हॉटेलमध्ये एक तरुणी अंमली पदार्थ घेऊन थांबली असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी रविवारी छापा टाकला. तेथे श्वेता कुमारीच्या खोलीची झडती घेतली. त्या ठिकाणी बॅगेतील पाकिटामध्ये ४०० ग्रॅम एमडी पावडर मिळाली. तिला ताब्यात घेऊन चौकशी करून सायंकाळी सोडण्यात आले होते. सोमवारी तिला पुन्हा कार्यालयात बोलावून चौकशी करण्यात आली. तिला एमडी बाळगल्याबद्दल समाधानकारक खुलासा करता आला नाही. त्यामुळे तिला एनडीपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.