Join us

सलग सुट्ट्यांमुळे होईल काेराेनाच्या रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:05 AM

मुंबई : राज्यात दोन दिवसांत ७१ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवसागणिक वाढणारी दैनंदिन रुग्णांची संख्या ...

मुंबई : राज्यात दोन दिवसांत ७१ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवसागणिक वाढणारी दैनंदिन रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, येत्या आठवड्यात येणाऱ्या सलग सार्वजनिक सुट्ट्यांमुळे संसर्गाचे प्रमाण खाली येऊन रुग्णसंख्येत घट होईल, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

येत्या आठवड्यात आर्थिक वर्ष संपत असल्याने बँकांना सुट्टी आहे. तसेच गुड फ्रायडे, शनिवार-रविवार असल्याने लोकांची वर्दळ कमी होऊन रुग्णसंख्या कमी होईल, असे निरीक्षण राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी नाेंदवले. राज्यात कोरोनाविषयक निष्काळजीपणामुळे संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. मागील काही महिन्यांत मास्कचा वापर न करणे, गर्दी करणे आणि सॅनिटायजर न वापरल्याचे सामान्यांच्या वागण्यातून दिसून आले. त्यात शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागांत हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.

सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी ८२ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. मृत्युदरही कमी असून तो ०.५ टक्के आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष न करता खबरदारी बाळगायला हवी. सध्या लक्षणविरहित व्यक्तीही घरगुती अलगीकरणात १४ दिवस असते. सक्रिय रुग्णसंख्येत त्या व्यक्तीचा समावेश केला जातो. त्यामुळे अशा स्थितीत संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी विलगीकरण, अलगीकरणही पाळणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या लॉकडाऊनची गरज नसली तरीही राज्य शासन किंवा पालिकेने दिलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.