पालिकेचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रक्रियेला वेग आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, खासगी रुग्णालय व्यवस्थापनांना खासगी कार्यालयांत लसीकरण सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय, लसीच्या साठ्याअभावी बंद करण्यात आलेले खासगी रुग्णालयातील लसीकरणही प्रक्रियाही साठा मिळाल्याने पालिकेने पुन्हा सुरू केली आहे.
पालिकेच्या आराेग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, खासगी रुग्णालय व्यवस्थापनाला खासगी कार्यालय आस्थापनांसह संयुक्तपणे लसीकरण राबविण्यास पालिकेने मान्यता दिली आहे. याअंतर्गत १०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची मुभा देण्यात आली आहे, यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यास पालिका प्रशासनास मदत होणार आहे. खासगी कार्यालयातील लसीकरणाचा समावेश केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांतही करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही लसीकरण प्रक्रिया राबविताना मनुष्यबळ, आपत्कालीन सेवेकरिता रुग्णवाहिका अशा सर्व सूचनांचे पालन होणे गरजेचे आहे. लसींचा साठा नसल्याने लसीकरण बंद करण्यात आलेल्या ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांनी आता लसीचे डोस घेतले आहेत. मुंबई पालिका प्रशासनाला एकूण २ लाख ३५ हजार लसींचे डोस मिळाले आहेत, त्यामुळे खासगी रुग्णालयातील लसीकरण प्रक्रियाही सुरळीतपणे राबविण्यात येईल, असेही डॉ. गोमारे यांनी सांगितले.
...........................