Join us

नोटा रद्द होण्याचा परिणाम : लग्नाचा बॅण्डबाजा झाला शांत

By admin | Published: November 11, 2016 3:53 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रातोरात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द होणार असल्याची घोषणा केली.

गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रातोरात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द होणार असल्याची घोषणा केली. मात्र अवघ्या दोन दिवसांवर मुलीचे लग्न असल्याने पत्रिका वाटण्यात व्यस्त असलेल्या राजोरिया कुटुंबीयांना सोमवारी रात्री उशिरा ही बातमी कळली आणि त्यांच्या छातीत धडकीच भरली. कारण लग्नासाठी काढलेल्या लाखोंच्या रोख रकमेचा ऐनवेळी वापर होऊ शकणार नसल्याने भरलग्नात नाचक्की होण्याच्या भीतीने त्यांना सध्या घेरले आहे.रश्मी राजेंद्र राजोरिया (२०) असे या तरुणीचे नाव आहे. ती गोरेगाव पश्चिम येथील मोतीलालनगर परिसरात त्रिकोणी मैदानाजवळ म्हाडा कॉलनीत आई, वडील आणि मोठ्या भावासोबत राहते. रश्मीचे बोईसर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी येत्या १२ नोव्हेंबर रोजी लग्न ठरले आहे. मुलीच्या लग्नात कोणतीही कसर शिल्लक राहू नये, यासाठी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीत पर्यवेक्षकाचे काम करणारे राजेंद्र सध्या तयारीत व्यस्त आहेत. मुलीच्या लग्नासाठी शनिवारी त्यांनी एक लाख ऐंशी हजारांची रोख रक्कम बँकेतून काढली. हे पैसे त्यांनी लग्नमंडप, कॅटरर्स, बॅण्डबाजा आणि अन्य लहान-मोठ्या खर्चासाठी काढले. तसेच त्यांचा मुलगा मोहननेदेखील ४० हजारांची रक्कम सोमवारी एटीएममधून काढली. ज्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे या नोटा बँकेतून बदलून आणायच्या कधी? आणि डेकोरेशनचे काम सुरू करायचे कधी? या प्रश्नाने ते सध्या बेचैन आहेत. रश्मीचा भाऊ मोहन याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, आमच्या कॅटरर्स आणि बॅण्डवाल्याने लग्नाच्या एक दिवस आधी आॅर्डरचे पूर्ण पैसे देण्यास सांगितले आहे. लांबलांबहून पाहुणे घरी येण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी आमच्यावर आहे. लग्नाची तारीख पुढे ढकलणे अशक्य आहे, कारण तसे केल्यास माझ्या बहिणीलाच समाजात दूषण लावले जाईल, या भीतीने वडिलांना ग्रासल्याचे त्याने नमूद केले. पैसे असूनही त्याचा काही वापर होत नाही, ही कल्पना अस्वस्थ करणारी आहे. लग्न तोंडावर असताना हा प्रकार घडल्याने आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न सध्या राजोरिया कुटुंबीयांना सतावत आहे.