ओतीव लोखंडातील १५३ वर्षे पुरातन शिल्पाकृतीचे संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:48+5:302021-05-31T04:06:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तब्बल १५३ वर्षे पुरातन असलेला, मिश्र धातूसह ओतीव लोखंडामध्ये अप्रतिम नक्षीकामासह घडविण्यात आलेला फिट्झगेराल्ड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तब्बल १५३ वर्षे पुरातन असलेला, मिश्र धातूसह ओतीव लोखंडामध्ये अप्रतिम नक्षीकामासह घडविण्यात आलेला फिट्झगेराल्ड दिवा व कारंजा शिल्पाकृतीचे महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाने संवर्धन व सुशोभीकरण केले आहे. जगातील एकमेव अशा या पुरातन व सुंदर शिल्पाकृतीची मेट्रो सिनेमाजवळील वासुदेव बळवंत फडके चौकात नव्याने उभारणी करण्यात आली असून, रविवारी त्याचे लोकार्पण करण्यात आले. शिल्पाकृतीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये सुमारे ४० फूट उंच कारंजा व ७ फूट उंच दिवा समाविष्ट आहे.
१८६० च्या दशकात सर रुस्तमजी जीजीभॉय या कापसाच्या व्यापाऱ्याने इंग्लंडमधील नॉर्थहॅम्प्टन शहराच्या मार्केट स्क्वेअरमध्ये उभ्या असलेल्या आयझॅक फाउंटनप्रमाणेच मुंबई शहरासाठी सुंदर दिवा व कारंज्यांची मागणी एडवर्ड हॅरिसन बारवेल आणि कंपनीकडे नोंदविली. कालांतराने त्यांच्या विश्वस्तांकडून, तत्कालीन एस्प्लनेड फी फंड समितीने १४ हजार रुपयांना ते खरेदी केले. १८६७ मध्ये मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर सॅम्युअल फिट्झगेराल्ड यांच्या गौरवार्थ हे अप्रतिम नक्षीकाम असलेले, मिश्र धातूसह ओतीव लोखंडाचे दिवा व कारंजे उभारण्यात आले. या शिल्पाच्या मधोमध ४० फूट उंचीवर गॅसबत्तीने पेटणारा दिवा व सभोवती चार दिवे होते. १८८० च्या दरम्यान मुंबईच्या समुद्रातील जहाजे या दिव्याला मुंबई बंदराचा दीपस्तंभ समजत असल्यामुळे मध्यरात्रीनंतर हा दिवा बंद करण्यात येत असे. या नक्षीदार कारंज्याला त्यावेळी मुंबई जलकामे विभागातर्फे विहार तलावातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.
इंग्लंडमधील आयझॅक फाउंटन १९६२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आले; परंतु महापालिकेने पुरातन वास्तू जतन विभागाच्या माध्यमातून या शिल्पाकृतीचे संवर्धन करून १५३ वर्षांनी पुन्हा त्याच जागी म्हणजे वासुदेव बळवंत फडके चौकात नव्याने उभारले आहे. संवर्धन करताना पुरातन वास्तू जतन विभागाने वेगवेगळ्या तज्ज्ञांची मदत घेताना थेट इंग्लंडमध्येही संपर्क साधला. तपशीलवार संदर्भ शोधून, सर्व अभ्यास करून, सदर कलाकृतीचे लहान-मोठे, असे ५८० भाग पूर्वीच्या संदर्भानुसार त्याच ओतीव लोखंडाच्या विटा तयार करून साचे बनवून संवर्धन करण्यात आले.
-------------------
- १८६७ मध्ये धोबी तलाव येथे हे सुंदर शिल्प उभारले गेले. तेव्हापासून म्हणजे १८६७ ते १९११ पर्यंत रॉबर्ट मनी शाळेसमोर म्हणजे आताच्या जेरमहल इमारतीसमोर हे कारंजे उभे होते.
- १९२० दरम्यान वाढलेल्या ट्रामच्या जाळ्यामुळे या कारंज्याला प्रथम मेट्रो सिनेमासमोर स्थलांतरित करावे लागले. १९६० च्या दशकात मात्र वाहतुकीची सुविधा व अपघात प्रतिबंध या कारणासाठी ही शिल्पाकृती हलवून त्याची रवानगी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या प्रांगणात करण्यात आली.
-------------------