पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:30+5:302021-01-03T04:07:30+5:30

मुख्यमंत्री - माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी ...

Conservation of environment should be a way of life for everyone - CM | पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी - मुख्यमंत्री

पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी - मुख्यमंत्री

Next

मुख्यमंत्री - माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे. माझी वसुंधरा अभियान राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा, अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माझी वसुंधरा ई-शपथ (ई-प्लेज) उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मी कटिबद्ध राहीन, अशी ई-शपथ घेतली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, या अभियानातून पर्यावरण संवर्धनाची एक नवीन दिशा मिळेल. आपण विकास करताना झाडांची कत्तल करतो आणि तोच विकास झाल्यानंतर रस्त्यांवर ऑक्सिजन मिळविण्यासाठी यंत्राचा वापर करतो. विकासातला हा असमतोल दूर करून पर्यावरणपूरक अशा शाश्वत विकासाची कास आपल्याला धरावी लागेल. यासाठी राज्यात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाला संपूर्ण पाठबळ देऊ, असे त्यांनी सांगितले. भावी पिढ्यांसाठी नद्या, डोंगर, निसर्ग, पर्यावरण या सर्वांची जपणूक ही आपल्या सर्वांची आता मोठी जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

तर, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान याप्रमाणेच माझी वसुंधरा अभियानालाही लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे सांगतानाच पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी दिली.

तर, वातावरणीय बदलांच्या संकटावर मात करण्यासाठी पर्यावरण विभागाने सुरू केलेल्या ई-शपथ उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. सर्वांनी या नव्या वर्षात पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने किमान एक तरी संकल्प करून त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरणातील बदलाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. राज्यात मागील वर्षभरात विविध आपत्तीग्रस्तांना सुमारे साडेतेरा हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. पण, अशी संकटे रोखण्यासाठी आता व्यापक प्रयत्न करावे लागतील. यासाठीच विकास आणि पर्यावरण याचा समतोल साधत पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा ध्यास राज्याने घेतला आहे.

या कार्यक्रमात ऑनलाइन उपस्थित सर्व मंत्री, अधिकारी आदींनी या वेळी ऑनलाइन लॉगईन करून पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याची ई-शपथ (ई-प्लेज) घेतली. राज्यातील सर्व लोकांनी www.majhivasundhara.in या संकेतस्थळाला भेट देऊन #EPledge या मेनूवर क्लिक करून ई-शपथ (ई-प्लेज) घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Web Title: Conservation of environment should be a way of life for everyone - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.