Join us  

ठाकरे गटाला परवानगी देण्याबाबत विचार करा; हायकोर्टाचे सरकार व कल्याण पोलिसांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 7:25 AM

दहीहंडीवरून वाद

मुंबई : छत्रपती शिवाजी चौकात दहीहंडी आयोजित  करण्याची परवानगी उद्धव ठाकरे गटाला देण्याबाबत विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व कल्याण पोलिसांना मंगळवारी दिले. छत्रपती शिवाजी चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील व त्यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन बासरे यांनीही पोलिसांकडे मागितली. मात्र, बासरे यांना परवानगी नाकारण्यात आली. तर पाटील यांना पोलिसांनी परवानगी दिली.

पोलिसांच्या या भेदभावपूर्ण वागणुकीविरोधात बासरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.  न्या. सुनील शुक्रे व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी सुरू होती. दहीहंडीमध्ये जास्तीत जास्त किती जणांनी सहभागी व्हायचे, याबाबत दोन्ही गटांना अटी घालाव्यात. जेणेकरून दोन्ही गट दहीहंडी सण साजरा करू शकतील, असे खंडपीठाने म्हटले. दोन्ही गटांना एकाच ठिकाणी दहीहंडी साजरी करायची असल्यास त्यांना वेगवेगळ्या  वेळा द्याव्यात व त्यामध्ये दोन-तीन तासांचे अंतर असावे, अशी सूचनाही न्यायालयाने यावेळी पोलिसांना केली.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून एका गटाला दहीहंडी साजरा करण्याची परवानगी दिली तर निश्चितच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कायदा व सुव्यस्था सांभाळणे पोलिसांचे काम आहे. केवळ या कारणास्तव ते एका गटाला परवानगी नाकारू शकत नाही, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर खंडपीठाने कल्याण डोंबिवली महापालिका, पोलिसांना बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :न्यायालयदहीहंडी