मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळे बंद केली असली तरी ३ सप्टेंबर रोजी 'फरवरदीयान'निमित्ताने प्रार्थनास्थळात प्रार्थना करण्याची परवानगी मिळावी, यासाठी बॉम्बे पारसी पंचायत (बीपीपी) चे निवेदन विचारात घ्यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयाने जैन समाजासाठी पर्युषणकाळात मुंबईतील तीन प्रार्थनास्थळे सुरू करण्याची परवानगी दिली असल्याची आठवण याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला करून दिली. फरवरदीयान हा सण नसून समाजातील लोक मृत बांधवांची आठवण काढून त्यांना श्रद्धांजली वाहतात. ही एक परंपरा आहे, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. बीपीपी सर्व सुरक्षात्मक खबरदारी घेईल.तसेच सामाजिक अंतराचा नियमही पाळण्यात येईल, अशी हमी याचिकादारांनी उच्च न्यायालयाला दिली. ३ सप्टेंबर रोजी सकाळी सात ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत केवळ ५० लोक प्रार्थना करतील. प्रत्येकी १००० चौरस फुटांमध्ये प्रार्थनास्थळाचे विभाजन करण्यात येणार आहे. एका विभागात केवळ २० लोकांनाच परवानगी देण्यात येईल. तर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे धार्मिक उत्सव साजरा करण्यास परवानगी देत नाहीत. ़़़तर विचार केला जाईलसर्व समाजाच्या वतीने फक्त काही लोकांनी प्रातिनिधिक प्रार्थना केली जाईल, असे आश्वासन बीपीपीने दिले तर त्यांच्या निवेदनाचा विचार करण्यात येईल, असे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.
पारसी प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत विचार करा - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 4:18 AM