एफडब्ल्यूआयसीई कामगार संघटनेचे गैरप्रकार रोखण्यास मान्यता रद्द करण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:09 AM2021-08-29T04:09:29+5:302021-08-29T04:09:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कामगारांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करणाऱ्या एफडब्ल्यूआयसीई-फेडरेशन ऑफ सिने इंडिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कामगारांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करणाऱ्या एफडब्ल्यूआयसीई-फेडरेशन ऑफ सिने इंडिया वेस्टर्न एम्प्लॉईज या संघटनेतील गैरप्रकार पाहता त्यांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. तसेच याबाबत कडक कारवाई करण्याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी मनसे चित्रपट कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत कला दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेले राजू साप्ते यांनी या कामगार संघटनेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने या संघटनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेने कंबर कसली होती. या संघटनेतील मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने कामगार आयुक्तांची भेट घेतली.
मनसे चित्रपट सेनेने कामगार आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात कामगारांकडून निवडणूक अनामत रक्कम म्हणून ५० हजार रुपये मागणे, निवडणूक प्रक्रियेत अजिबात पारदर्शकता न ठेवणे, कोणत्याही रकमेचा हिशेब न देणे, मनमानी पद्धतीने कार्य करणे यासारखे अनेक प्रकार उजेडात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली, अशी माहिती मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
कामगार आयुक्तांनी याबाबत कारवाई करण्याबाबत विचार सुरू असून या कामगार संघटनेची मान्यता रद्द करण्याचा विचार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.